आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ढगांची निर्मिती, पावसाच्या प्रक्रियेसाठी प्रयाेगशाळा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - गोड, ताज्या पाण्याचा सर्वात महत्त्वाचा स्रोत म्हणून ढगांकडे पाहिले जाते. म्हणूनच मेघनिर्मिती आणि पावसाची प्रक्रिया समजून घेण्याचे काम महाबळेश्वर (जि. सातारा) येथे सुरू झाले आहे.

उच्च तुंगता मेघ भौतिकी प्रयोगशाळा ही फक्त ढगांचा अभ्यास करणारी देशातली एकमेव संस्था भारतीय उष्णदेशीय हवामान विज्ञान संस्थेने येथे उभारली आहे. “ढगांचा फारसा शास्त्रीय अभ्यास यापूर्वी आपल्याकडे झालेला नाही. म्हणूनच पूर्णपणे मान्सूनवर अवलंबून असलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेसाठी या संस्थेचे काम महत्त्वाचे असेल. ढगांच्या भौतिकशास्त्राचा सखोल अभ्यास झाल्यानंतर भारतीय हवामानशास्त्र विभाग (आयएमडी) देत असलेल्या पावसाच्या अंदाजात अचूकता येईल,” असे या प्रयोगशाळेचे प्रमुख वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जी. पंडीथुराई म्हणाले. वातावरणातल्या वाढत्या मानवी हस्तक्षेपाचा ढगांवर होणारा परिणाम आणि पाऊस देणाऱ्या ढगांचा अभ्यास या प्रयोगशाळेत केला जात आहे.

“ढगांच्या पारंपरिक अभ्यासासाठी विमानांचा वापर होतो. मात्र विमानोड्डाणाचा कालावधी मर्यादित असतो. विविध तांत्रिक परवानग्या घेतल्याशिवाय विमान उड्डाण होत नाही. अनेकदा असे व्हायचे की उड्डाणाच्या परवानग्या मिळेपर्यंत आम्हाला हव्या असलेल्या ढगांच्या स्थितीत बदल व्हायचा. परवानगीच्या तांत्रिक बाबींमध्ये पुष्कळ वेळ जात असल्याने सातत्यपूर्ण निरीक्षणे घेण्यात अडचणी यायच्या. म्हणून कायमस्वरूपी प्रयोगशाळा उभारण्याचा निर्णय घेतला गेला,” असे त्यांनी स्पष्ट केले.

पावसाळ्याचे चार महिने आमच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचे असतील. या कालावधीत ढगांचा वेध घेतला जाईल. हवेतील सूक्ष्म कण (एरोसोल्स) ढग निर्मितीवर काय परिणाम करतात, हे जाणून घेण्यासाठी ढगांचा दीर्घकाळ अभ्यास करावा लागेल. त्यामुळे या प्रयोगशाळेतून तत्काळ काही संशोधन बाहेर पडेल, अशी अपेक्षा ठेवता येणार नाही. सातत्यपूर्ण निरीक्षणे आणि विश्लेषणानंतरच पावसाबद्दलच्या ठोस निष्कर्षांपर्यंत पोचता येईल. कृत्रिम पावसाचे प्रयोग यशस्वी होण्यासाठीही याचा उपयोग होईल, असे डॉ. पंडीथुराई म्हणाले.

मान्सूनपूर्व कालावधीत, एप्रिल-मे महिन्यात भारतीय उपखंडातल्या वातावरणात सूक्ष्म कणांचे अस्तित्व वाढते, असे डॉ. पंडीथुराई यांनी सांगितले. ते म्हणाले, की पश्चिमेकडून येणारे वारे सूक्ष्म कणांना (समुद्री क्षार, धूलिकण) वाहून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. मान्सून काळातल्या पावसानंतर वायव्य भारत आणि पाकिस्तान येथील हवामानातील सूक्ष्म कणांचे अस्तित्व अत्यल्प उरते. हिवाळ्यात पश्चिमी वारे मंदावल्यामुळे या कालावधीत सूक्ष्म कणांचे प्रमाण कमी होते. या पार्श्वभूमीवर सूक्ष्म कणांचा पावसावर होणारा परिणाम तपासणे आवश्यक आहे.

महाबळेश्वरच का?
ढगांच्या अभ्यासासाठी महाबळेश्वर निवडण्यामागची कारणे भौगोलिक आहेत.
- पश्चिम घाटातले (वेस्टर्न घाट) उंच ठिकाण म्हणून महाबळेश्वर प्रसिद्ध आहे. हमखास, अतिपावसाचा प्रदेश असलेल्या महाबळेश्वराचे सरासरी पाऊसमान ५५७० मिलिमीटरपेक्षा जास्त आहे.
- महाबळेश्वरातल्या सर्वोच्च डोंगरावर म्हणजेच समुद्रसपाटीपासून १४३८ मीटर उंचीवर ही प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. नैसर्गिक उंचीमुळे अभ्यासासाठी आवश्यक पावसाळी ढग अगदी कमी अंतरावर उपलब्ध होतात. पावसाळ्यात तर ही प्रयोगशाळा पावलावरचेही दिसणार नाही इतक्या ढगांमध्ये बुडून गेलेली असते.
- अरबी समुद्रातून आगमन झालेले मान्सून पावसाचे ढग वेस्टर्न घाटाच्या या भागात विनाअडथळा पोचतात. त्यामुळे या प्रयोगशाळेतील सर्व उपकरणांची दिशा पश्चिमेकडे ठेवण्यात आली आहे.
- घनदाट जंगल असलेल्या या परिसरात मानवी हस्तक्षेप, प्रदूषण तुलनेने कमी आहे. सूक्ष्म कण, ढग आणि पावसाचे भौतिकशास्त्र समजून घेण्यासाठी वेस्टर्न घाट हे आदर्श स्थान आहे.

वीज पडण्याआधी
या केंद्रातील लाइटनिंग नेटवर्कच्या माध्यमातून वादळी पाऊस आणि विजांचाही अभ्यास होतो. ढगांचा प्रवास कोणत्या दिशेने होणार, वादळी पाऊस पडणार का, विजा चमकणार याचा अभ्यास या नेटवर्कमध्ये होतो. रेडिओ फ्रिक्वेन्सीचा वेध घेऊन कोणत्या भागात वीज पडण्याची शक्यता आहे, याचे अनुमान वीज पडण्याच्या आधी किमान २ तास वर्तवणे यामुळे शक्य झाले आहे. यानुसार संबंधित यंत्रणांना माहिती दिली जाते.

अभ्यास कशाचा ?
ढगांची उंची, घनता, आकारमान, त्यातल्या बाष्पाचे प्रमाण, ढगांची दिशा, थेंबांची संख्या, आदी निरीक्षणे येथे नोंदवली जातील. यासाठी रडार, व्हिडिओ कॅमेरे, सेन्सर्स आदींचा समावेश असलेली संगणकीकृत यंत्रणा येथे आहे. वीस किलोमीटर परिघातील ढगांचा वेध घेण्याची क्षमता येथील रडारांमध्ये आहे.

दैनंदिन अंदाजासाठी
या प्रयोगशाळेतून हवेत ३५ किलोमीटर उंचीवर जाणारा फुगा दररोज सोडला जातो. या फुग्यामधील सेन्सरमुळे वाऱ्यांची दिशा, वेग, तापमान, हवेचा दाब हा तपशील मिळवला जातो. दैनंदिन हवामान अंदाज वर्तवण्यासाठी या माहितीचा उपयोग होतो. देशात इतर ३५ केंद्रांमधून असे फुगे दररोज सोडले जातात.
बातम्या आणखी आहेत...