आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lag Ja Gale Turns 50, Still Fresh: Lata Mangeshkar

‘लग जा गले.’ 50 वर्षांनंतरही संस्मरणीय !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - कृष्णधवल चित्रपटांचा काळ त्यातील गीतांनी, अर्थवाही शब्दकळेने आणि उत्तम चित्रीकरणाने रसिक मनात सतत उजळता राहिला. या सुवर्णकाळातल्या ‘लग जा गले के फिर ये हॅँसी रात हो ना हो.’ या गीतानं मंगळवारी पन्नाशी साजरी केली. हे रसिकप्रिय गीत अजरामर करणार्‍या खुद्द लतादीदींनीच ट्विट करून त्याच्या सुवर्णमहोत्सवी आठवणींवर मोहोर उमटवली.

राज खोसला दिग्दर्शित ‘वो कौन थी’ हा रहस्यप्रधान चित्रपट 1964 मध्ये प्रदर्शित झाला होता. साधना, मनोजकुमार, हेलन आणि प्राण यांची अदाकारी या चित्रपटात होती. संगीत मदनमोहन यांचे होते. याआधी ‘अयशस्वी चित्रपटांचे यशस्वी संगीतकार’ असा शिक्का मदनमोहन यांच्यावर बसला होता. ‘वो कौन थी’ चित्रपटाच्या संगीताने तो धुऊन निघाला, कारण हा चित्रपट व्यावसायिकदृष्ट्याही यशस्वी ठरला. त्याचीच पुनरावृत्ती मदनमोहन यांच्या संगीताने सजलेल्या ‘मेरा साया’ या चित्रपटात झाली.

‘वो कौन थी’ या चित्रपटातील सर्वच गाणी हिट झाली. लग जा गले, नैना बरसे रिमझिम रिमझिम, जो हमने दास्ता अपनी सुनाई आप क्यू रोये, शोख नजर की बिजलिया दिलपे मेरे गिराये जा, छोडकर तेरे प्यार का दामन, ये बतादे के हम किधर जाये. ही सारी गाणी आजही रसिकांच्या ओठांवर तरळतात. मात्र त्यातील ‘लग जा गले.‘ या गाण्याची लोकप्रियता सर्वाधिक आहे.

सुंदर समीकरण जुळले
हे गाणं मी पन्नास वर्षांपूर्वी रेकॉर्ड केलं होतं. पण ते आजही जुनं वाटत नाही. मदनमोहन यांचं संगीत, राजा मेहंदी अली खॉं यांचे शब्द, असे सुंदर समीकरण जुळले होते. या चित्रपटातील इतर गाणीही गाजली, पण लग जा गले.हे माझं विशेष आवडीचं गाणं आहे.’’ लता मंगेशकर, ‘ट्विटर’वरून

जयललितांची भूमिका
खुद्द गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी ‘माझी आवडती गाणी’मध्येही या गाण्याचा समावेश केला आहे. त्या वर्षीच्या फिल्मफेअर अवॉर्डसाठीही या गाण्याचे नामांकन झाले होते. हा चित्रपट यशस्वी ठरल्याने त्याचा रिमेक दक्षिणेकडेही झाला. तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी या चित्रपटाच्या तमिळ आणि तेलुगू रिमेकमध्ये प्रमुख भूमिका केली होती.
(फोटो - संग्रहित छायाचित्र)