आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Landslide Death Toll In Pune's Malin Village Soars To151

माळीणकरांना आता समुपदेशकांचा आधार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - दुर्घटनेच्या सातव्या दिवशीही राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे (एनडीआरएफ) अथक बचावकार्य सुरू असून, मंगळवारपर्यंत 151 मृतदेह ढिगार्‍याबाहेर काढण्यात यश आले आहे. कुजलेल्या मृतदेहांमुळे दुर्गंधी पसरली असून, रोगराई निवारणासाठी आरोग्य विभागाचे पथकही अखंडपणे काम करत आहे. दरम्यान, आप्तेष्ट गमावलेल्या मृतांच्या नातेवाइकांना समुपदेशकांच्या माध्यमातून मानसिक आधार दिला जात आहे.

मंचर येथील उपजिल्हा रुग्णालय, घोडेगाव, अडिवरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र याठिकाणी असलेल्या जखमींना 12 समुपदेशकांनी मंगळवारी मार्गदर्शन केले. वैयक्तिक व गट पातळीवर तपासणी करुन त्यांचे मनोबल टिकवण्याचे काम समुपदेशक करत असल्याची माहिती आरोग्य उपसंचालक डॉ. एच.एच. चव्हाण यांनी दिली.

ढिगार्‍याखाली सापडलेल्या 151 मृतदेहामध्ये 71 महिला, 59 पुरुष व 21 बालकांचा समावेश आहे. 47 मृत जनावरेही ढिगार्‍याखालून काढण्यात आले असून त्यांना माळीण गावाजवळील एका खड्डयात पुरण्यात आले आहेत. शासकीय आकडेवारीनुसार या घटनेत 44 कुटुंबे गाडली गेलेली असून, त्यात 168 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. आमदार दिलीप वळसे पाटील यांनी मंगळवारी पुन्हा घटनास्थळाला भेट दिली. माळीणमध्ये 85 टक्के मदतकार्य झाले असून बुधवारपर्यंत ते पूर्णत्वास जाईल, असे त्यांनी सांगितले. संततधार पाऊस सुरूअसल्याने बचाव पथकास अडथळे येत असून मदतकार्य संथगतीने करावे लागत आहे.
महाडमध्ये दरड कोसळून दोन जणांचा मृत्यू
महाडजवळील तुळशी विन्हेरे मार्गावर सोमवारी रात्री दरड कोसळून दोघांचा मृत्यू झाला. नातूनगरच्या घुबरवाडी येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास ही दुर्घटना घडली, त्यात हे दोघे ढिगार्‍याखाली दबले. सुमारे 12 तास उलटल्यानंतर मंगळवारी सकाळी आपत्ती व्यवस्थापन व बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. जेसीबीद्वारे मातीचे ढिगारे उपसण्यात आले तेव्हा भागोजी सुतार (60) आणि परशुराम सुतार (60) या दोघांचे मृतदेह सापडले. या मार्गावर फारशी वर्दळ नसते. मात्र, कशेडी घाट बंद झाल्यामुळे महाड- नातूनगर असा पर्यायी मार्ग वापरला जातो.