आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामस्थांनी व्यक्त केली 300-400 लोक मृत्युमुखी पडल्याची भीती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - आंबेगाव तालुक्यातील माळीण गावाजवळ दरड (डोंगरकडा) कोसळल्याने मोठा अपघात झाला आहे. यात डोंगराखालील वस्तीतील 40 घरे ढिगा-याखाली दबली. त्यातील सुमारे 400 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या ढिगा-यातून आतापर्यंत 25 मृतदेह बाहेर काढण्यात आली आहेत. दरम्यान, या गावात आज सकाळी एसटी नेल्यावर तिच्या चालकाला आणि वाहकाला गावच दिसले नाही. त्यानंतर ही दुर्घटना उघडकीस आली. या दुर्घटनेत 300 ते 400 लोक मृत्युमुखी पडले असावेत, असे येथील ग्रामस्थांनी सांगितले आहे.
यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, की पुणे जिल्ह्यातील एका गावात आलेल्या नैसर्गिक संकटाचे मला अतिव दुःख आहे. मी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांना तेथे जाण्यास सांगितले आहे. काही वेळात ते तेथे पोहोचतील.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले, की पुणे जिल्ह्यात डोंगरांच्या कुशीत वसलेली अनेक गावे आहेत. या गावांची गांभिर्याने विचार करावा लागेल. उद्या सकाळी नवी दिल्ली येथून पुण्यासाठी रवाना होणार आहे. उद्या मी या गावाला भेट देणार आहे.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, की 'एनडीआरएफ'च्या दोन टीम घटनास्थळी पाठवण्यात आल्या आहेत. बचाव कार्य सुरू आहे.
रात्रीपर्यंत 12 मृतदेहांची ओळख पटली. त्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत.
1- रखमाबाई सखाराम झांजरे ( वय- 35 वर्षे)
2- विठ्ठल झांजरे-
3- हौसाबाई विठ्ठल झांजरे-
4- अमर भिमा ढेंगळे- 30
5- संजय कमाजी पोटे - 26
6- हेमंत संजय पोटे- 12
7- हौसाबाई कमाजी पोटे - 50
8- मारूती दगडू गाडेकर- 35
9- मोतीराम हरीभाऊ शिंगाडे- 25
10- दामु धोंडु पोटे - 42
11- गोरडे - स्‍त्री- 12
12- बाळु - पुरूष- 03
या व्‍यति‍रीक्‍त चार महिला मृत्‍युमुखी पडल्‍या असून त्‍यांची ओळख पटलेली नाही.
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकरजवळ असलेल्या माळीण गावावर आज सकाळी डोंगरकडा कोसळली. याची माहिती बराच काळ कुणाला नव्हती. या गावात दररोज पुण्यातून सकाळी एक एसटी जाते. दररोजप्रमाणे चालक आणि वाहक एसटी घेऊन गावाजवळ आले. तेव्हा त्यांना गावच सापडेना. गावाच्या रस्त्यावर प्रचंड चिखल आणि राडारोडा पडला होता. त्यांनी याची माहिती जिल्हा प्रशासनाला दिली. त्यानंतर या दुर्घटनेची माहिती सर्वांना मिळाली.
जखमींना मंचर येथील रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले आहे. पण ढिगा-याखाली दबलेल्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहेत. दरम्यान पावसाचे प्रमाण अधिक असल्याने मदतकार्यात अडचणी येत आहेत.
बुधवारी पहाटेच्या सुमारास ही दुर्घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. त्यानंतर लगेचच घटनास्थळी बचावकार्यासाठी पथके रवाना करण्यात आली. यात एनडीआरएफच्या दोन पथकांचा समावेश आहे. या दरडीखाली सुमारे 40 घरे दबली गेली आहेत. वस्तीतील केवळ तीन ते चार घरेच यातून बचावली असल्याची माहिती मिळाली आहेत.
पाऊस सुरू असल्याने मदत कार्यात अनेक अचडणी येत आहेत. दरड कोसळलेल्या ठिकाणार्यंत जायला रस्ताही नाही, त्यामुळे जेसीबी पोहचण्यात अडचणी येत आहेत. प्रशासनाने याबाबात माहिती मिळताच त्वरीत एनडीआरएफचे पथक रवाना केले आहे. पण या पथकालाही मदतकार्यात अनेक अडचणी येत आहेत. दरम्यान, राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू असतानाच या घटनेबाबत माहिती मंत्र्यांना मिळाली. त्यामुळे बैठकीनंतर लगेचच मुख्यमंत्री आमि उपमुख्यमंत्री घटवास्थळाकडे रवाना झाल्याची माहिती मिळाली आहे.
मतदकार्यासाठी एकच मार्ग
माळीण हे गाव अत्यंत दुर्गम भागात असल्याने याठिकाणापर्यंत पोहचण्यास अनेक अडचणी येत आहेत. या गावापर्यंत पोहोचण्यासाठी एकमेव मार्ग आहे. हा मार्गही अत्यंत दुर्गम परिसरातून जाणारा आहे. त्यामुळे बचाव पथके, रुग्णवाहिका यांना पोहोचतानाही खबरदारी बाळगावी लागत आहे.
ढिगा-याखाली दबलेल्यांची संख्याही अधिक?
याढिगा-याखाली सुमारे 150 जण अडकले असल्याचे सांगण्यात येत आहे. पण या वस्तीची लोकसंख्या सुमारे 300 ते 400 असल्याचे सांगितले जात आहे. त्यात पहाटे सगळे झोपेत असताना अपघात झाला. त्यामुळे ढिगा-याखाली अडकलेल्यांची संख्याही अधिक असू शकते असे सुत्रांचे म्हणणे आहे.
स्थानिक नागरीक मदतकार्यात सहभागी
स्थानिक नागरीकांनी याठिकाणी अपघातानंतर लगेचच तातडीने मदतकार्य करण्याचा प्रयत्न केला. पण पावसामुळे नागरिकांना अडचणी येत होत्या. तरीही बचाव पथके पोहचेपर्यंत यासर्वांनी जमेल त्या पद्धतीने मदतकार्य करण्याचा प्रयत्न केला.
पुढील स्लाईडवर बघा, गावावर कोसळलेली डोंगर कडा....आणि या गावाची तसेच दुर्घटनेची माहिती सांगणाऱ्या ग्रामस्थाचा व्हिडिओ.....
शेवटच्या स्लाईडवर बघा, पुणे-मुंबई ध्रुतगती मार्गावर कसा कोसळतोय पाऊस...रस्त्यावर येणारे पाण्याचे प्रवाह...