आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात नॉन स्टॉप उत्साहात बाप्पाला भावपूर्ण निरोप

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - पावसाची दमदार हजेरी असूनही कार्यकर्त्यांचा अखंडित उत्साह, भिजणा-या वाद्यांसह ढोल- ताशा- नगारा-लेझीम पथकांचे वेधक सादरीकरण, रस्ताभर पसरलेल्या आकर्षक रंगावली पायघड्या, प्रत्येक चौकात भव्य रांगोळ्या, अखेरच्या चौकात श्रींच्या मस्तकी होणारी पुष्पवृष्टी यांच्या जोडीला ‘बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या,’ असा गजर करत लाडक्या गणरायाला दिलेला भावपूर्ण निरोप, ही या वर्षीच्या पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीची वैशिष्ट्ये ठरली. सुमारे 28 तास मिरवणूक सुरू होती. जगभरात प्रसिद्ध असलेली पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास सुरू झाली. ती गुरुवारी दुपारी दोन वाजेपर्यंत चालली. बुधवारी सकाळी मंडईमधील लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीला प्रारंभ झाला. उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुरेश कलमाडी, पुण्याच्या महापौर चंचला कोद्रे, आमदार गिरीश बापट, रमेश बागवे, नीलम गो-हे, दीप्ती चौधरी, विनायक निम्हण, पुण्याचे पोलिस आयुक्त गुलाब पोळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
आकर्षक रांगोळ्या : लक्ष्मी रस्त्यावर मानाच्या गणेशाचे स्वागत करण्यासाठी राष्ट्रीय कला अकादमीच्या कार्यकर्त्यांनी अनेक तास खपून मार्गावरील प्रत्येक चौकात स्त्री सक्षणीकरणाचा संदेश देणा-या सुंदर आणि भव्य रांगोळ्या रेखाटल्या होत्या. तसेच संपूर्ण मिरवणूक मार्गवर रांगोळ्यांच्या पायघड्याही घातल्या होत्या.
स्पीकरच्या भिंती घटल्या : कानठळ्या बसवणा-या आवाजातील स्पिकर्सच्या भिंती यंदा खूपच कमी झाल्याचे जाणवले. अगदी मोजक्या काही मंडळांनी स्पीकर्सच्या भिंती उभारून वेडेवाकडे अंगविक्षेप करत नाचगाणी केली. बहुसंख्य मंडळांच्या कार्यकर्त्यांनी पारंपरिक वाद्यांची पथके मागवली होती. ब-याच मंडळांच्या कार्यकर्त्यांनी स्वत:च ढोलताशा पथकांची निर्मिती केली होती. अनेकांनी गेल्या सहा महिन्यात वादन शिकून एक नवा पायंडा घालून दिला.


मानाच्या श्रींची शिस्तबद्ध मिरवणूक
कसबा गणेश : ग्रामदैवत आणि मानाचा पहिला गणपती असलेल्या कसबा गणेश मंडळाची विसर्जन मिरवणूक लक्ष्मी रस्त्याने वाजतगाजत निघाली. प्रभात बँड, रमणबाग प्रशालेचे ढोल-ताशा पथक, नगारावादन पथक आणि दोन दिंड्या असा लवाजमा असूनही कसबा गणपती नेहमीपेक्षा अर्धा तास आधीच विसर्जनस्थळापूर्वीच्या अखेरच्या अलका टॉकीज चौकात दुपारी सव्वादोन वाजता दाखल झाला.


तांबडी जोगेश्वरी : मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी मंडळाचा होता. नगारा, अश्वपथक, त्यावर पारंपरिक पोशाखातील युवती, ढोल-ताशा पथक, लेझीम पथक यांसह महिलांची लक्षणीय उपस्थिती या मंडळासोबत होती. या महिलांनी पारंपरिक खेळही सादर केले.


गुरुजी तालीम : मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम मंडळाने नेहमीप्रमाणेच गुलालाचा मुक्त वापर केला. या मंडळासोबत नादब्रह्म, शिवगर्जना यांची प्रचंड ढोल-ताशा पथके, लोकसेवामधील शालेय विद्यार्थ्यांचे पथक होते. सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास विसर्जन झाले.


तुळशीबाग : मानाचा चौथा गणपती तुळशीबाग मंडळाचा होता. स्वरूपवर्धिनी, गजलक्ष्मी, हिंद तरुण मंडळ, कल्पतरू संस्थेचे विद्यार्थी अशा पथकांनी गणरायाला सलामी दिली. श्रींची भव्य मूर्ती आकर्षक रंगांच्या फुलांनी सजवलेल्या रथात विराजमान होती. हा गणपती अलका चौकात येताच पुष्पवृष्टी करण्यात आली.


केसरीवाडा : मानाचा पाचवा गणपती केसरीवाड्याचा. शिवमुद्रा, शौर्य अणि श्रीराम ही ढोल-ताशा पथके, बिडवे बंधूंचा सनई-चौघडा यांच्या साथीने सायंकाळी 6.20 वा. अलका चौकात आगमन झाले आणि पावणेसात वाजता विसर्जन झाले. दरम्यान, सव्वाचारच्या सुमारास तासभर जोरदार पाऊस झाला. मात्र, कार्यकर्त्यांचा उत्साह तसूभरही कमी झाला नाही. ढोल-ताशा -ध्वज-लेझीम पथकांतील तरुणाई पूर्वीच्याच जोशाने खेळ करत होती. पाहणारी मंडळीही छत्र्या-रेनकोट घेऊन सादरीकरणाचे कौतुक करत होती.