आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींना पंतप्रधानपदी पाहण्याची इच्छा!, लतादीदींचे ‘नमो नम:’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना आता गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांचेही पाठबळ मिळाले आहे. शुक्रवारी पुण्यात एका शानदार सोहळ्यात लतादीदींनी मोदीच पंतप्रधान व्हावेत, अशी इच्छा बोलून दाखवली. नाजूक आवाजात त्या म्हणाल्या, ‘हम जो चाहते हैं, आप जो चाहते हैं, कि नरेंद्रभाई पीएम की जगह नजर आएं, ये सबकी इच्छा है.’ हे ऐकून हजारो पुणेकर श्रोत्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. मोदी यांनीही मान लवून लतादीदींना नमस्कार केला आणि आभार मानले.

लतादीदींच्या ‘ऐ मेरे वतन के लोगो...’ या गीताचे आर्त स्वर ऐकून कधीकाळी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांचे डोळे पाणावले होते. त्याच दीदींनी शुक्रवारी मोदींना पीएमपदासाठी जाहीर शुभेच्छा दिल्या. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर सुपरस्पेशालिटी रुग्णालयाचे उद्घाटन मोदींच्या हस्ते झाले. त्यानंतर लतादीदी बोलत होत्या. आशा भोसले, मीना खडीकर, हृदयनाथ, उषा व आदिनाथ मंगेशकर हे कुटुंबीय या वेळी उपस्थित होते. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते.

मोदींनीही धरला ताल : लतादीदींच्या अगोदर हृदयनाथ व आशा भोसले यांनी मनोगत व्यक्त केले. सत्तरी ओलांडलेल्या आशाताईंनी मोदींसाठी गुजराती गीताच्या ओळी गायल्या. त्यावर मोदींनीही मान डोलावत ताल धरला.

वाजपेयींची आठवण
रुग्णालयाच्या पहिल्या वास्तूचे उद्घाटन अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते झाले होते, अशी आठवण हृदयनाथ यांनी सांगितली. दीदींनी शेवटी यावर कळस चढवला. त्या म्हणाल्या, ‘मोदी मला भावासारखे. त्यांच्याशी मी फोनवर खूपदा बोलले. हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी कोणाला बोलवायचे हा विचार सुरू झाला तेव्हा त्यांचेच नाव आठवले. आता त्यांना प्रत्यक्ष भेटल्याचा खूप आनंद आहे.

मंगेशकरांकडून सन्मान हे तर बक्षीस
मंगेशकर कुटुंबीयांनी केलेल्या कौतुकाची मोदी यांनी लगेच परतफेड केली. ‘या कुटुंबाने माझा एवढा सन्मान केला हे माझे सौभाग्य आहे. दीदींनी 6 महिन्यांपूर्वी निमंत्रणाचे पत्र पाठवले. हे पत्र मी आयुष्यातील सर्वांत मोठे बक्षीस समजतो,’ असे ते म्हणाले. मंगेशकर कुटुंबाने कोट्यवधी देशवासीयांना संगीताच्या माध्यमातून निरोगी ठेवले. आता हॉस्पिटलच्या माध्यमातून आरोग्यसेवाही सुरू ठेवली असल्याचे ते म्हणाले.

मोदींचे महाराष्ट्रावर लक्ष
चार महिन्यांपूर्वी मोदींनी पुण्यात जंगी सभा घेऊन देशव्यापी प्रचाराची सुरुवात केली. शुक्रवारी ते पुन्हा पुण्यात आले. मंगेशकर कुटुंबीयांच्या निमंत्रणावरून नामवंत शिक्षणतज्ज्ञ, कला सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर, उद्योजक, बिल्डर, बँकिंग, वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्ती मोदींना ऐकण्यासाठी आले होते. मोदींनीही भाषणात राजकारणाचा चकार शब्दसुद्धा न काढण्याची खबरदारी घेतली. नंतर उपस्थितांशी संवाद साधण्याची संधी त्यांनी सोडली नाही.