आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वेगळा विदर्भ मागणारे महाराष्ट्राला काय देणार? अजित पवार यांचा भाजप नेत्यांना टोला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगली - ‘उद्धव ठाकरे, राज ठाकरे असोत किंवा देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी यांना ग्रामीण महाराष्ट्राची जाणच नाही. वेगळ्या विदर्भाची मागणी करणारे नेते महाराष्ट्राचे नेतृत्व काय करणार?’ असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी भाजपच्या नेत्यांना लगावला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार मेळाव्यात ते बोलत होते.

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर हल्लाबोल करताना पवार म्हणाले, ‘‘मोदींकडे पाहून उभ्या देशाने मतदान केले; पण आज काय परिस्थिती आहे? इंधनाचे दर वाढले, रेल्वेचे भाडे वाढले, केंद्राच्या धोरणामुळे दाभोळचा वीज प्रकल्प बंद आहे. परिणामी महागाई वाढत आहे. आघाडी सरकारने दरवर्षी शेतीमालाच्या आधारभूत किमती वाढवून दिल्या; पण मोदी सरकारने अपवाद वगळता शेतीमालाच्या आधारभूत किमती वाढवल्या नाहीत. महाराष्ट्रातील सिंचन योजनांना निधी मागितला की मागील सरकारने तिजोरी रिकामी केली, असे उत्तर दिले जाते. असे असते तर नेपाळ, भूतानला 10-10 हजार कोटी रुपयांची मदत द्यायला पैसे आले कोठून? असा प्रश्नही उपमुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला. या वेळी गृहमंत्री आर. आर. पाटील, ग्रामविकासमंत्री जयंत पाटील, राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे, प्रदेश उपाध्यक्ष इलियास नायकवडी यांचीही भाषणे झाली.

निवडणुकीत हरलो तर राजकारण सोडेन : आर. आर.
गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी भाजपचे खासदार संजय पाटील यांच्यावर टीका केली. ‘मोदींच्या जिवावर निवडून आलेल्या काही खासदारांना माझ्यामुळेच मोदी पंतप्रधान झाले, असे आता वाटू लागले आहे. हेच लोक मला विधानसभा लढवण्याचे आव्हानही देत आहेत. मी विधानसभा लढवणारच आहे आणि मोठ्या मताधिक्याने जिंकणार आहे. मी हरलो तर राजकारण सोडेन; पण जिंकलो तर मोदी लाटेवर स्वार झालेल्यांनी राजीनामा द्यावा,’ असे प्रतिआव्हान आबांनी दिले.

सहकार म्हणजे काय, ठाकरेंना माहीत आहे ?
‘महाराष्ट्रात वसंतदादा पाटील, शरद पवार यांच्यासारख्या नेत्यांनी सहकारी संस्थांचे जाळे निर्माण केले. रांज्याचा ग्रामीण भाग या संस्थांमुळे विकसित झाला. उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरे यांनी एक तरी संस्था उभी केली का? यांना सहकार म्हणजे काय हे तरी माहीत आहे का? आणि ज्यांनी सहकारी संस्थांचे वाटोळे केले, त्यांना सोबत घेऊन हे आता राज्याचे नेतृत्व करायला निघाले आहेत, असा आरोप पवारांनी केला.

आरक्षण देण्याचा अधिकार संसदेला
धनगर, लिंगायत आणि अन्य काही समाजांचा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे; परंतु आरक्षण देण्याचा राज्य शासनाला अधिकार नाही, तो संसदेचा आहे. आम्ही फक्त शिफारस करू शकतो आणि ती करण्यासंदर्भात लवकरच निर्णय होईल, असे अजित पवार यांनी सांगितले.

देवेंद्र फडणवीस थापाडे
दुष्काळ आणि गारपिटीची मदत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या नातेवाइकांनाच मिळाल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्यावर पवार म्हणाले, ‘फडणवीस थापाडे आहेत. ते धादांत खोटे बोलत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या पत्नीचे नाव दुष्काळ मदतनिधीच्या यादीत होते; पण त्यांनी ती मदत नाकारली. बारामतीला गारपीट झाली, आमच्याही शेतीचे नुकसान झाले; पण आम्ही ती मदत नाकारली.’

‘यांना’ एकसंघ महाराष्ट्र नकोय
भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी यांनी पश्चिम महाराष्ट्राच्या सिंचन योजनांना निधी द्यायला विरोध केला. त्यांना एकसंघ महाराष्ट्र नकोय, तर वेगळा विदर्भ हवा आहे. लोक दुधखुळे नाहीत. अशा नेत्यांना महाराष्ट्र कदापि स्वीकारणार नाही, असा दावा अजित पवार यांनी केला.