आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lavasakar Narendra Modi Liable Person For Prime Minister Gulabchand

‘लवासा’कारही पडले नरेंद्र मोदींच्या प्रेमात, गुलाबचंद यांच्याकडून गुणगान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - राष्‍ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या स्वप्नातील गिरिस्थान ‘लवासा’ हा प्रकल्प वसवणारे प्रख्यात बिल्डर अजित गुलाबचंद हेसुद्धा नरेंद्र मोदी यांच्या प्रेमात पडले आहेत. ‘देशाला नेतृत्व बदलाची गरज असून मोदी हाच देशापुढील सर्वोत्तम पर्याय आहे,’ असे वक्तव्य त्यांनी गुरुवारी पुण्यात केले.


मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ँड अ‍ॅग्रिकल्चरतर्फे आयोजित रियल इस्टेटसंबंधित प्रदर्शनाचे उद्घाटन हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीचे अध्यक्ष अजित गुलाबचंद यांच्या हस्ते झाले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. कॉँग्रेसप्रणीत केंद्र सरकारवर टीका करताना नव्या पक्षाने देशाचे नेतृत्त्व करण्याची वेळ आल्याचे ते म्हणाले. पंतप्रधानपदासाठी माझा पाठिंबा मोदी यांना असेल, असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले.


‘पुढील तीस वर्षात देशात तीस कोटी रोजगार निर्माण करायचे तर चांगले नेतृत्त्व हवे. त्यामुळे दुस-या पक्षाला संधी मिळायला हवी. सद्य:स्थितीत बदल आणण्यासाठी कल्पक नेतृत्त्वाचीच गरज आहे. असे नेतृत्त्व मोदींमध्ये दिसत असल्याने माझा पाठिंबा त्यांनाच असेल. मोदी विकासाची भाषा बोलतात. उद्योगांसाठी ते ‘रेड कार्पेट’ अंथरतात. बाजारपेठेला अनुकूल वातावरणनिर्मिती करण्यात ते यशस्वी होतात. मोदी गुंतवणूक आकर्षित करू शकतात,’ अशी स्तुतिसुमने गुलाबचंद यांनी उधळली.


मेधा पाटकर ठरल्या खोट्या
पर्यावरणविषयक कायद्यांचे उल्लंघन केल्यामुळे अडखळलेल्या ‘लवासा’चा विषय काढताच गुलाबचंद त्रासले. ते म्हणाले, ‘लवासाबद्दलची सर्व माहिती केंद्र आणि राज्य शासनाला दिली आहे. या प्रकल्पातील सगळी कामे व्यवस्थित सुरू असून ती लवकरच पूर्ण होतील याची मला खात्री आहे. लवासाबाबत मेधा पाटकर
खोट्या ठरल्या आहेत.


काँग्रेस, केंद्र सरकारवर सडकून टीका
‘गेल्या दहा वर्षांत कॉँग्रेसने काही केलेले नाही. देशात सुधारणा नाही. धोरणात सातत्य नाही. देशातील 442 प्रकल्प रखडले आहेत. त्याचे परिणाम देशाला भोगावे लागताहेत. महागाई वाढतेय, रुपयाचे अवमूल्यन होतेय आणि आर्थिक स्थिती पूर्ण ढासळली आहे. परदेशी तर सोडाच पण भारतीय कंपन्याही देशात गुंतवणूक करण्यास तयार नाहीत. ज्यांनी गुंतवणूक केली त्यांचे हात पोळले....दे लॉस्ट देअर मनी,’’ अशा शब्दात गुलाबचंद यांनी केंद्रावर टीका केली.