आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधिशास्त्र कोश मराठीत; डायमंड पब्लिकेशन्सचा उपक्रम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- मराठी शाळा, मराठी भाषा आणि विविध अभ्यासशाखांचे मराठीतून शिक्षण याविषयी सरकारी पातळीवर धोरणात्मक निर्णय झाले असले तरी वस्तुस्थिती त्याच्या विरुद्ध आहे. इंग्रजी माध्यमाचा प्रभाव आणि वापर शहरी भागात अधिकच आहे. या पार्श्वभूमीवर आपल्या देशातील कायद्यांच्या संदर्भातील विधिशास्त्र कोशाची निर्मिती मराठीमध्ये करण्यात आली आहे. पुण्याच्या डायमंड पब्लिकेशन्सतर्फे 1040 पृष्ठांचा विधिशास्त्र कोश सिद्ध करण्यात आला असून डॉ. बी. आर. जोशी यांनी त्याचे संपादन केले आहे.
या आगळ्यावेगळ्या ग्रंथनिर्मितीविषयी डायमंड पब्लिकेशन्सचे दत्तात्रेय पाष्टे यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले की, राज्यातील विविध विद्यापीठांत अनेक विद्याशाखांचा मराठीतून अभ्यास करणारे लक्षावधी विद्यार्थी आहेत. त्यांना विविध अभ्यासविषयांचे ग्रंथ आणि संदर्भग्रंथ मराठीतून उपलब्ध होण्याची गरज आहे. विधिशास्त्र ही महत्त्वाची ज्ञानशाखाही त्याला अपवाद नाही. मात्र, विधिशास्त्रावरील बहुसंख्य ग्रंथ इंग्रजीत आहेत. मराठीत या विषयावर तुरळक पुस्तकेच मिळतात. देशातील सर्व कायदे आणि तत्संबंधी व्यवहार प्रामुख्याने इंग्रजीतच आहेत. त्यामुळे मान्यताप्राप्त ग्रंथही इंग्रजीतच आहेत. सरकारी व्यवहार प्रामुख्याने मराठी भाषेत व्हावेत, असे धोरण असल्याने अलीकडे जिल्हा पातळीपर्यंतचे अनेक न्यायाधीश काही निकालपत्रे मराठीत तयार करताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर कायद्याच्या विद्यार्थ्यांची, वकिलांची तसेच अन्य संबंधित मंडळींच्या सोयीसाठी आम्ही विधिशास्त्र कोश निर्माण करण्याचा निर्णय घेतला.
सर्वांनाच उपयोगी असा कोश
डॉ. बी. आर. जोशी म्हणाले, विद्यार्थ्यांपासून ते संशोधक, शासनकर्ते, कायदातज्ज्ञ, न्यायाधीश, वकील आणि माध्यमांचे प्रतिनिधी या सा-यांनाच या कोशाचा उपयोग होईल. प्रामुख्याने कायदेविषयक संज्ञाकोश असे या कोशाचे स्वरूप आहे. विद्यार्थ्यांसाठी तर कायदेविषयक भाषेचे अवलंबन यामुळे सुकर होईल. द लेक्सिकॉन वेब्स्टर डिक्शनरी (दोन खंड) आणि सुप्रिय कोर्ट ऑन वर्ड्स अँड फ्रेजेस या इंग्रजीतील उत्तम ग्रंथांचा वापर सारेच करतात; पण अनेकदा विद्यार्थ्यांसाठी, माध्यमाच्या प्रतिनिधींसाठी तसेच वकील मंडळींसाठी न्यायालयीन कायदेविषयक प्रक्रिया स्थानिक भाषेत समजावून देण्याची व घेण्याची आवश्यकता असते. भारतीय दंडसंहिता, फौजदारी व्यवहार संहिता, दिवाणी प्रक्रिया संहिता, विधी तत्त्वज्ञान, हिंदू कायदे, माहितीचा अधिकार, माहिती तंत्रज्ञान कायदे, सायबर कायदे, पर्यावरण कायदे यांचा प्रस्तुत कोशात विचार केलेला आहे.
असा आहे विधिशास्त्रकोश
-1340 कायदेविषयक संज्ञा-संकल्पना व सिद्धांतांचे मराठीत स्पष्टीकरण
-विधिशास्त्रातील कायदे, संज्ञा यांचा प्रामुख्याने समावेश
-भारतीय कायद्यांचाच विचार
-कलमांचा मथितार्थ
-पूरक आणि उपयुक्त अशी चार परिशिष्टे
-काही मूलभूत संज्ञांचे विस्तृत स्पष्टीकरण
-सर्व नोंदी इंग्रजी वर्णानुक्रमाने