पुणे - ‘या देशात अंबानी कुटुंबातल्या पाच जणांसाठी 28 मजली इमारत उभारली जाऊ शकते. परंतु वंचित, भटके, गोरगरिबांना झोपडी टाकण्याइतकीसुद्धा जमीन मिळत नाही. भूमिहीनांना राहायला घर आणि कसायला जमीन मिळवण्यासाठी येत्या काळात सरकारी जमिनी ताब्यात घेणार आहे,’ असा इशारा ‘उपराकार’ पद्र्मशी लक्ष्मण माने यांनी मंगळवारी दिला.
शाहू महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘समाजवादी रिपब्लिकन पक्ष’ या नव्या पक्षाची स्थापना करत असल्याची घोषणा माने यांनी पत्रकार परिषदेत केली. ‘भूमिहीनांसाठी भूमीमुक्ती’हा पक्षाचा पहिला कार्यक्रम त्यांनी जाहीर केला. ‘गरीब-मध्यमवर्गींयांच्या हातातून राजकारण सुटत चालले असून धनदांडग्यांकडे सत्तेची सूत्रे गेली आहेत. सर्वच प्रस्थापित पक्षांचे नेतृत्त्व उच्चवर्णीयांच्या हातात गेले आहे. गरीब लोक लोकशाही व्यवस्थेतूनच बाहेर फेकले जात आहेत. आर्थिक, शैक्षणिक विषमतेमुळे गरिबांच्या हातात जगण्याची साधने उरलेली नाहीत. या परिस्थितीशी लढण्यासाठी नवा पक्ष सुरू करत आहे,’ अशी भूमिका माने यांनी मांडली.
नव्या पक्षाचा कार्यक्रम
0 शेती नाही, घर नाही अशा वंचिंतांना सरकारी जमिनी मिळवून देणार. फक्त निरा खोर्यातच सरकारी मालकीची सुमारे चाळीस हजार एकर जमीन पडून आहे. उद्योगपतींना पायघड्या घालून कवडीमोलाने जमिनी देणार्या सरकारविरोधात सत्याग्रह करून या जमिनी ताब्यात घेणार.
0 शिक्षणाच्या खासगीकरणाला संपूर्ण विरोध करणार. गरीब, र्शीमंत कोणीही असला तरी त्याला एकाच प्रकारचे शिक्षण मिळाले पाहिजे. शिक्षण व्यवस्थेत जोपर्यंत विषमता आहे तोवर समाजातली विषमता कायम राहील. गडगंज पैसा असणार्या बापाच्या पोरांना कसलेही शिक्षण, कोणत्याही पदवी घेण्याची सोय आहे. समतेचा विचार नाकारणारी खासगी शिक्षण व्यवस्था उखडून टाकणार.
प्रस्थापित पक्षांना विरोध
शाहू, फुले, आंबेडकर, गांधी यांची नावे आम्ही रोज घेतो. ‘आरएसएस’चा पंतप्रधान देशात सत्तेवर येईल, असे स्वप्नातही नव्हते. पण लोकांनी आमचे कान फाडले. आम्ही मूर्ख असल्याचे सांगितले. डावा विचार, डावी माणसे आता राहिलेली नाहीत. गरिबांच्या उद्धारात सर्वच राजकीय पक्ष कमी पडले आहेत. गरिबांची गरज कोणालाच उरलेली नाही. त्यामुळे सर्वच प्रस्थापित पक्षांना आमचा विरोध असेल, असे माने यांनी स्पष्ट केले. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसने किंवा सोनिया गांधी यांनी सन्मानाने बोलावल्यास त्यांच्याबरोबर आम्ही जाऊ. उजव्या-प्रतिगामी संघटनांबरोबर मात्र कधीच जाणार नाही, अशी पुस्ती त्यांनी जोडली.
माझा विश्वास कायद्यावर
संवेदनशील लेखक असलेल्या लक्ष्मण माने यांच्यावर त्यांच्याच संस्थेत काम करणार्या काही महिलांनी बलात्काराचे आरोप केले होते. यानंतर काही काळ माने फरार झाले होते. काही काळ ते अटकेतही होते. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. बलात्काराच्या आरोपांमुळे नव्या पक्षाची प्रतिमा डागाळणार नाही का, असा प्रश्न पत्रकारांनी केला असता माने म्हणाले, ‘माझे सार्वजनिक जीवन महाराष्ट्राने पाहिले आहे. कोणी काय आरोप करावेत, हे माझ्या हातात नाही. कुरघोडीच्या या राजकारणाला माझ्याकडे उत्तर नाही. मी गुन्हेगार असेन तर मला शिक्षा होईल. कायद्यावर माझा विश्वास आहे.’’
आर्थिक मागासांना आरक्षण
‘ज्याचा बाप गरीब त्या प्रत्येक पोराला आरक्षण मिळावे. मग तो कोणत्याही जातीचा असो. एकाच जातीला आरक्षण द्यायला हा देश कोणा एकाच्या मालकीचा नाही. सर्व आर्थिक मागासांना आरक्षण मिळाले पाहिजे. विशिष्ट जातीत जन्माला येऊन त्यांनी चूक केलेली नाही,’ असे सांगत माने यांनी मराठा आरक्षणावरची भूमिका स्पष्ट केली.