आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • LBT Issue Pune, Nagpur, Sangli, Kolhapur Market Band

सरकारचा निषेध, एलबीटीला विरोध; बाजार बंद

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - जकातीला पर्याय म्हणून सरकारने सुरू केलेल्या स्थानिक संस्था कराला (एलबीटी) राज्यातील पुणे, पिंपरी- चिंचवड, नाशिक, नागपूर, ठाणे, कोल्हापूर व सांगली महापालिका क्षेत्रातील व्यापार्‍यांनी तीव्र विरोध केला आहे. एक एप्रिल पासून लागू होणार्‍या कराच्या निषेधार्थ सोमवारी व्यापार्‍यांनी राज्यातील प्रमुख शहरात बाजारपेठ बंद ठेवली होती, लघु उद्योजकांनीही व्यवहार बंद ठेवले. पुणे, पिंपरीत भव्य मोर्चा काढून या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यात आले.
पुण्याच्या सारसबागेतील गणपती मंदिरात महाआरती करून व्यापार्‍यांनी आंदोलनाला सुरुवात केली. त्यानंतर पुणे व पिंपरीत भव्य मोर्चाही काढण्यात आला. पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल म्हणाले की, एलबीटी व्यापार्‍यांच्या पूर्णत: विरोधात आहे. हा विरोध आम्ही शासनाकडे वेळोवेळी व्यक्त करूनही तो लागू करण्यात आला आहे. साडेबारा टक्के व्हॅट लागू असताना एलबीटी कशाला? एलबीटीमुळे व्यापारी, लघुउद्योजकांचा भ्रमनिरास झाला आहे, अशी टीकाही त्यांनी केली. या आंदोलनात व्यापार्‍यांच्या 25 हून अधिक संघटना सहभागी झाल्या होत्या. मंगळवारीही आंदोलन सुरू राहणार आहे.

नागपुरातही आंदोलन
सोलापूर, नागपूरमध्येही एलबीटीच्या विरोधात सोमवारी सकाळपासूनच व्यापारी संघटनांचे पदाधिकारी रस्त्यावर उतरले होते. व्यापारी संघटनांनी पुकारलेल्या बंदला दोन्ही शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला.

सांगली, कोल्हापुरातही बंद
सांगलीत - जूनपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार असल्याने येथील व्यापारीही आजच्या आंदोलनात सहभागी झाले होते. शहरातील व्यापार्‍यांनी सोमवारी लाक्षणिक बंद पाळला, त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे 50 कोटींचे व्यवहार ठप्प झाले होते. कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी धान्य बाजार, सर्व प्रकारची दुकाने, सराफ बाजार या ठिकाणी बंदमुळे शुकशुकाट होता. बंदच्या दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडली नाही. नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी व्यापार्‍यांनी बंदद्वारे आपली एलबीटीविरोधातील भूमिका अधिक तीव्र केली आहे.

सरकारने लक्ष घालावे : वळसे
मुंबई - एलबीटीला विरोध असल्याची भावना विरोधी पक्षांनी व्यक्त केल्यानंतर या प्रश्नात सरकारने लक्ष घालण्याचे आदेश विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी सोमवारी विधानसभेत दिले. गिरीष बापट यांनी याबाबत औचित्याचा मुद्दा उपस्थित केला होता. तर, ‘एलबीटी’मुळे पुन्हा परवाना राज आल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. या कराच्या विरोधात असंतोष व्यक्त करण्यासाठी व्यापारी रस्त्यावर उतरले आहेत. महापालिका हद्दींमध्ये जकात आणि ‘एलबीटी’सुद्धा नको, अशी भूमिकाही फडणवीस यांनी मांडली.

नव्याने कर आकारणी नाहीच
कायद्याची अंमलबजावणी करणे, हे मनपाचे काम आहे. त्यानुसार एलबीटीची अंमलबजावणी सुरू आहे. याबाबत प्रत्येक मुद्दा व्यापार्‍यांशी वेळोवेळी झालेल्या चर्चा, बैठकांमध्ये स्पष्ट करण्यात आला आहे. एलबीटीसाठी कोणतेही दर नव्याने आकारण्यात आलेले नाहीत. जो माल बाहेरून आणला जाईल त्यावरच कर लागू होईल, स्थानिक मालासाठी हे दर नाहीत. त्यामुळे व्यापार्‍यांनी सर्वसामान्यांना वेठीला धरू नये.
विलास कानडे, सहआयुक्त पुणे महापालिका