आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lets Go Pandhari : Tukoba Palkhi Celebrated Its Circle

चला पंढरीला जाऊ : तुकोबाच्या पालखीने पहिल्याच रिंगणांनी फेडले पारणे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बारामती - विठ्ठल हा चित्ती ।गोड लागे गाता गीतीं ।।
आम्हां विठ्ठल जीवन । टाळ चिपुळिया धन ।।
विठ्ठल विठ्ठल वाणी । अमृत हे संजीवनी ।।
रंगला या रंगें । तुका विठ्ठल सर्वांगे ।।
संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या या अभंगाप्रमाणे घर संसाराची सारी चिंता मागे टाकून तुकोबाच्या पालखीतील वारकरी अकरा दिवसांचा 150 किलोमीटरचा पायी प्रवास करून मंगळवारी सकाळी आठ वाजता बेलवाडी (ता.इंदापूर) येथे पोहोचले. पालखी सोहळ्यातील पहिल्या गोल रिंगणात ‘पुंडलिका वरदे हरि विठ्ठल’च्या गजरात उत्साहाने धावले. झेंडेकरी, तुळशी वृंदावन डोक्यावर घेतलेल्या महिला, वीणेकरी यासह आबालवृद्ध देहभान विसरून धावल्या, तर असंख्य भाविकांनी भक्तीचा हा सोहळा याच देहि याच डोळा अनुभवला. योगगुरू रामदेवबाबाही तुकोबांच्या पालखीत सहभागी होण्यासाठी आले होते, मात्र दर्शनानंतर सुरक्षेच्या कारणावरून पोलिसांनी त्यांना रिंगण सोहळ्यात सहभागी होण्यास मनाई केली.

सणसरचा मुक्काम आटोपून तुकोबांच्या पालखीने मंगळवारी सकाळी बेलवाडीकडे प्रस्थान ठेवले. रामदेवबाबा व त्यांचे अनुयायी सणसर ते बेलवाडी असे दोन किलोमीटरचे अंतर पायी चालत दिंडीत सहभागी झाले होते. पत्रकारांशी
बोलताना त्यांनी हा भक्ती शक्तीचा संगम असल्याची भावना व्यक्त केली. काही अंतरापर्यंत त्यांनी पालखी
रथाचे सारथ्यही केले.


ज्येष्ठांमध्ये उत्साह टिपेला
सकाळी आठ वाजता पालखी बेलवाडी येथील मैदानात दाखल झाली. सरपंच शोभा गणगे यांनी स्वागत केले. त्यानंतर तुकोबांची पालखी रथातून काढून मंचावर ठेवण्यात आली. काही वेळातच झेंडेकरी व महिला भाविकांनी रिंगण पूर्ण केले. साठी ओलांडलेले अनेक ज्येष्ठ नागरिक तरुणाईला लाजवेल अशा वेगात धावताना पाहून उपस्थित चकित झाले. त्यानंतर मानाच्या अश्वाने रिंगणातून दोन फे-या पूर्ण केल्या. भाविकांनी मानाच्या घोड्याच्या टापाखालील माती कपाळी लावून वंदन केले. या सोहळ्यात दुपारच्या भोजनानंतर पालखी अथुर्णे गावाकडे मार्गस्थ झाली, तिथेच आजचा मुक्काम आहे. या गावातही भाविकांनी अतिशय उत्साहाने पालखीचे स्वागत केले.


विठ्ठल दर्शन 24 तास
भाविकांना विठुरायाचे दर्शन घडावे यासाठी बुधवारपासून श्री विठ्ठलाचे सर्व नित्योपचार बंद करण्यात येत असून 24 तास दर्शन सुरू राहणार आहे. या शिवाय पदस्पर्श, मुखदर्शन तसेच ऑनलाईन दर्शन व्यवस्थेव्दारे यात्रेच्या काळात दररोज सुमारे 70 ते 80 हजार भाविकांना दर्शनाची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी बाबासाहेब बेलदार यांनी दिली.