पुणे - घुमान येथे वाजतगाजत पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या हिशेबाचे सादरीकरण संयोजक-आयोजक आणि महामंडळाने गुरुवारी केले. मात्र, खर्चाच्या आकड्याने दोन कोटी २९ लाख ४३ हजार ५०० रुपयांची झेप घेऊनही हिशेबात अनुत्तरित प्रश्नांची संख्या अधिक असल्याचे चित्र आहे.
पत्रकारांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळाली नसल्याने पारदर्शकता पाळली गेली नसल्याची चर्चा हाेत आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्ष भारत देसडला यांनी पत्रकारांसमोर संमेलनाचे लेखापरीक्षण सादर केले. चार्टर्ड अकाउंटंट आर. पी. मुथा अँड असोसिएट्सतर्फे भागीदार अभिजित सोनटक्के यांनी हा ऑडिट रिपोर्ट तयार केला आहे.
देसडला यांच्यासमवेत ‘सरहद’ या निमंत्रक संस्थेचे संजय नहार तसेच महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य या वेळी उपस्थित होत्या.
२५ लाखांचे हिशेबही स्पष्ट नाही
राज्य सरकारकडून संमेलनासाठी दरवर्षी २५ लाख रुपयांचा निधी दिला जातो. संमेलनाच्या लेखा परीक्षणात ‘थेट खर्च’ या सदराखाली (हेड) सरकारी पैसे वापरल्याची माहिती देसडला यांनी दिली. मात्र, या हेडअंतर्गत प्रत्यक्ष खर्ची पडलेल्या रकमेची एकूण बेरीज ४४ लाख, आठ हजार, ८३० रुपये आहे. त्यामुळे उर्वरित १९ लाख आठ हजार ८३० रुपयांचे काय, हा प्रश्न अनुत्तरितच राहताे.
पंजाब सरकारच्या मदतीविषयीही मौन
पंजाब सरकारने संमेलन हा ‘स्टेट इव्हेंट’ म्हणून स्वीकारल्याने तेथील खर्चाचा मोठा वाटा त्यांनी परस्पर उचलला होता. हिशेबात मात्र पंजाबमधील मंडप, निवास, भोजन, मीडिया सेंटर, माध्यम प्रतिनिधींच्या अमृतसरमधील निवासाची व्यवस्था, दैनंदिन प्रवास या हेडखाली मोठ्या रकमा दाखवण्यात आल्या आहेत. पंजाब सरकारने नेमकी कशी व कोणत्या स्वरूपाची मदत संमेलनासाठी केली, या प्रश्नावर देसडला यांनी ‘पायाभूत सुविधा पुरवल्या’ एवढेच उत्तर दिले.
रेल्वे, प्रवासावर सर्वाधिक खर्च
संमेलनाच्या खर्चाचे सर्वात मोठे आकडे रेल्वे प्रवास आणि त्यादरम्यानच्या खान-पानाचे आहेत. ७७ लाख ५३ हजार ०४६ आणि ५२ लाख ३१ हजार ६२४ रुपये केटरिंग आणि वॉटरिंग अशी हेड्स देण्यात आली आहेत. हा खर्च एक कोटी २९ लाख ३४ हजार ६७० रुपये इतका मोठा आहे. स्थानिक प्रवासासाठीही ९ लाख १७ हजार ६५९ रुपये खर्ची पडले आहेत.
साहित्यबाह्य खर्चही शासकीय निधीतूनच?
शासनाने दिलेले २५ लाख हे साहित्यविषयक बाबींवरच खर्च केले जावेत, असा संकेत असताना या हेडमध्ये ट्रॉफीज (३ लाख, ९३ हजार, २६०), सोशल मीडिया प्रमोशन (७६ हजार, ५१८), स्टेज लाइट्स व जनरेटर्स (७ लाख, १९ हजार, १०४), वेबसाइट डिझाइन (२ लाख १९ हजार ३५६), स्टेशनरी व प्रिंटिंग (४ लाख ९८ हजार १०५) अशा रकमा देण्यात आल्या आहेत. हे खर्च कुठल्या अर्थाने साहित्यविषयक आहे, या प्रश्नावरही ‘हे संमेलनाचे खर्च आहेत’, असे उत्तर देण्यात आले.