पुणे - गहनगूढ शैलीने मराठी साहित्यविश्वात अनोखा ठसा उमटवणा-या जी. ए. कुलकर्णी यांची अखेरची साहित्यकृती वाचकांच्या भेटीस येणार आहे. मौज प्रकाशनाच्या वतीने हे लेखन आता प्रकाशात येत आहे.
जीएंच्या भगिनी नंदा पैठणकर यांनी ही माहिती दिली. कथाकार, कादंबरीकार जीए उत्तम अनुवादकही होते. जीएंच्या वाचनात यूजिन ओ नील यांचे ‘लाँग डेज जर्नी इन टू नाईट’ हे नाटक आले. ही कथा जीएंना अतिशय भावली आणि त्यांनी हे नाटक अनुवादित केले ते ‘दिवस तुडवत अंधाराकडे’ या नावाने. या नाटकाच्या हस्तलिखितावर मात्र स्वत: जीएंनीच ‘हे प्रकाशित करू नये’ अशी नोंद करून ठेवली होती. पण मौजेचे श्री. पु. भागवत यांनी हा अनुवाद वाचला. त्यांना तो अतिशय आवडला आणि तो प्रकाशनाचा आग्रह त्यांनी धरला. तोवर जीएंचे निधन झाले होते. त्यामुळे श्रीपुंचा आग्रह मानून परवानगी दिली, असे पैठणकर म्हणाल्या. सु. रा. चुनेकर यांनी या अनुवादाचे संपादन केले आहे. ७ डिसेंबर रोजी पुण्यात कवयित्री डॉ. अरुणा ढेरे यांच्या हस्ते हा अनुवाद प्रकाशित होणार आहे.