नूतन संमेलनाध्यक्ष डाॅ. श्रीपाल सबनीस यांनी अध्यक्षीय भाषण व प्रकट मुलाखतीत जाेरदार फटकेबाजी करत अनेक मुद्द्यांवर चर्चा घडवून अाणली.
राज्य आणि देशातील प्रत्येक चळवळीला एक तत्त्वज्ञानाची बैठक होती. या बैठकीतून चळवळी उभ्या राहिल्या. भुकेपासून भाकरीपर्यंत प्रत्येक गोष्टीला जशी तत्त्वज्ञानाची बैठक लाभली तशी ती सेक्स म्हणजेच लैंगिक विषयाला लाभली नाही, असे सांगतानाच या विषयाचीही चळवळ झाली पाहिजे, अशी रोखठोक भूमिका साहित्य संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी प्रकट मुलाखतीतून मांडली. एका सत्याने धिंड निघण्याची वेळ आली. त्यामुळे मी सत्यवादी असल्याने राजकारणात जाणार नाही, असे स्पष्टपणे सबनीस यावेळी म्हणाले.
सायंकाळच्या सत्रात पत्रकार संतोष शेणई, प्रसन्न जोशी, चक्रधर दळवी यांनी घेतलेल्या मुलाखतीत सबनीस यांनी कोणतीही भीडमुर्वत न बाळगता उत्तरे दिली. महापुरुष दु:खविरहित मानवी कल्याणाचे साध्य नसून साधन असतात, असे माझे स्पष्ट मत आहे.
जगातल्या सर्व प्रश्नांची सर्वकालिक उत्तरे एकाच महापुरुषाकडून मिळाली पाहिजेत अशी समाजाची अपेक्षा असते. पण कोणताही महापुरुष ही त्या काळाची निर्मिती असते. त्यामुळे त्यांनी शोधलेली उत्तरे ही संबंधित काळाशी सुसंगत असतात.
एकाच महापुरुषाकडून सर्व उत्तरे मिळाली असती तर अनेक महापुरुष जन्माला येण्याची गरज नव्हती, असे स्पष्ट मत सबनीसांनी नोंदवले. कोणत्याही महापुरुषांवर त्यांचे अनुयायी श्रद्धा आणि अंधश्रद्धेची पुटे चढवतात. त्यात मूळचा महापुरुष दिसेनासा होतो आणि त्याच्या नावावर नवी दुकानदारी सुरू होते, असे ते म्हणाले.
राजकारणात जाणार नाही
मी सत्यवादी आहे. माझ्यासारखा सत्यवादी, वेडा माणूस चालणारच नाही. एक साधे सत्य बोललो तर गाढवावरून धिंड निघायची वेळ आली. आता परत अशी इच्छा नसल्याने राजकारणात कदापि जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
पुरुषी वर्चस्वामुळे महिलांची अडचण
आज समाजात ५० टक्के गुंतागुंत ही सेक्स या िवषयामुळे आहे. आपल्याकडे समाजात पुरुषी वर्चस्व असल्याने स्त्रिया लैंगिकतेशी संबंधित विषयावर आजही मोकळेपणाने बोलू शकत नाहीत. त्यामुळे अनेकदा या महिलांची विविध परिस्थितीत घुसमट होत राहते. वात्स्यायनाच्या कामसूत्रावरच आपले सेक्स आधारित आहे. यासंबंधीची मंदिर शिल्पेही आहेत. पण या विषयाला तत्त्वज्ञानाची पक्की बैठक न लाभल्याने समाजात ही चळवळ म्हणून समोर येऊ शकली नाही. यासाठी खरे तर एखादा महापुरुष जन्माला यायला हवा. मी यासाठी पुढाकार घेण्याचा प्रयत्न करणार नाही, पुढाकार घेणारही नाही. कारण मला माझी गाढवावरून धिंड काढून घ्यायची नाही, असा टोलाही सबनीसांनी मारला.
शेतमालासाठी लवाद
दोन-अडीच एकरवाला कोरडवाहू शेतकरी उत्तम पीक घेतो. या यशोगाथा घराेघर पोहोचवा, असे सांगत शेतमालाला भाव मिळावा यासाठी लवाद स्थापावा, अशी मागणी श्रीपाल सबनीसांनी केली.