आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकमान्यांच्या ‘मंडालेहून सुटके’ची यंदा शताब्दी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व केलेल्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची मंडाले (तेव्हाचा ब्रह्मदेश, आताचा म्यानमार) येथील कारागृहातून 8 जून रोजी सुटका होऊन 15 जून रोजी ते भारत भूमीवर मद्रासला पोहोचले. या घटनेस शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने भारताच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान केलेल्या क्रांतिकारक परिवारांचा पुणेकरांच्या वतीने सन्मान केला जाणार आहे.

लोकमान्य टिळक विचार मंचाने 15 जूनला पुण्यात शताब्दी सोहळा आयोजित केला आहे. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर अध्यक्षस्थानी असणार आहेत. केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर, छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज खासदार उदयनराजे भोसले, पेशव्यांचे वंशज उदयसिंह पेशवा यांची प्रमुख उपस्थिती असेल. लोकमान्य विचार मंचचे अध्यक्ष शैलेश टिळक यांनी ही माहिती दिली.
‘मंडालेतून सुटका’ शताब्दी सोहळ्यात देशभरातील 26 क्रांतिकारकांच्या वारसांचा सन्मान होणार आहे. बहादूरशहा जफर, राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे, मंगल पांडे, वासुदेव बळवंत फडके, उमाजी नाईक, उधमसिंह, भगतसिंग, राजगुरू, वि. दा. सावरकर, बाबू गेनू, अश्फाकउल्ला खान, सचिंद्रनाथ बक्षी, बटुकेश्वर दत्त, अनंत कान्हेरे, दामोदर चाफेकर आदींच्या परिवारांचा यात समावेश आहे. टिळकांच्या दुर्मिळ छायाचित्रांच्या संग्रहाचेही प्रकाशन या वेळी होईल.
धीरोदात्त आणि संस्मरणीय : ‘ज्यूरींनी काहीही निकाल दिला असला, तरी मी पूर्ण निर्दोषी आहे, अशी माझी धारणा आहे. न्यायालयाची सत्ता श्रेष्ठ असेल, पण वस्तुजाताच्या नियतीचे नियमन करणारी सत्ता त्याहूनही श्रेष्ठ आहे. माझ्या स्वातंत्र्यापेक्षा माझ्या हालअपेष्टांनीच मी अंगीकृत केलेले कार्य अधिक भरभराटीस यावे, असाही परमेश्वराचा संकेत असेल,’ असे उद्गार न डगमगलेल्या टिळकांनी खटल्याच्या सुनावणीनंतर काढले. लोकमान्यांच्या या धीरोदात्त उद्गारांनी अपेक्षित परिणाम साधला. मुंबईच्या गिरणी कामगारांनी प्रथमच हरताळ पाळला. देशात अनेक ठिकाणी इंग्रजांविरोधात दंगे उसळले. शेकडो क्रांतिकारकांनी टिळकांच्या शिक्षेतून प्रेरणा घेतली.

‘देशाचे दुर्भाग्य’
‘केसरी’ आणि ‘मराठा’ या वृत्तपत्रांमधून ब्रिटिश सत्तेविरोधात टिळकांचे जहाल लेखन सुरू होते. या लेखनाचे चटके लंडनला बसू लागले होते. सन 1908 च्या 12 मे रोजी ‘केसरी’तून ‘देशाचे दुर्भाग्य’ आणि 9 जूनला ‘हे उपाय टिकाऊ नाहीत’ हे दोन अग्रलेख प्रसिद्ध झाले. या अग्रलेखांवरून टिळकांविरोधात देशद्रोहाचा खटला भरण्यात आला. त्यांना सहा वर्षे कारावास व हजार रुपये दंडाची शिक्षा झाली. 24 जून 1908 ला टिळकांना मुंबईत ताब्यात घेण्यात आले. वयाच्या 52 व्या वर्षी व्याधींनी पोखरलेले शरीर, कुटुंबीयांची काळजी आणि स्वातंत्र्यलढ्याची चिंता सोबत घेऊन टिळक मंडालेच्या तुरुंगात जाण्यास सज्ज झाले.