पुणे - निवडणूकपूर्व सर्वेक्षणांमध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि कॉँग्रेसच्या जागा कमी दाखवल्या गेल्या. त्यामुळे आम्ही सावध झालो आहोत. जोमाने काम केल्याने यंदा आमच्या जागांमध्ये वाढ होईल, असा दावा राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भास्करराव जाधव यांनी सोमवारी केला.
कॉँग्रेस आघाडीने 2009 च्या निवडणुकीत राज्यात 25 जागा जिंकल्या होत्या. यात यंदा सात-आठ जागांची भर पडेल. भाजप-शिवसेना देशात नरेंद्र मोदींची हवा असल्याच्या भ्रमात
राहिल्याने त्यांना मोठा फटका बसेल, असे भाकीतही जाधव यांनी वर्तविले.
2009 च्या निवडणुकीत मावळ, शिरूर, कोल्हापूर, हातकणंगले तसेच नगर या पाच जागा ‘राष्ट्रवादी’ला गमवाव्या लागल्या होत्या. कॉँग्रेसची संपूर्ण साथ न मिळाल्यास सर्वाधिक फटका ‘राष्ट्रवादी’ला बसतो, याची जाणीव झाल्याने पवारांनी एकोपा निर्माण करण्याचे प्रयत्न केले. मात्र यानंतरही कोकण, मराठवाड्यात ‘राष्ट्रवादी’चे कार्यकर्ते कॉँग्रेसच्या विरोधात काम करीत असल्याबद्दल विचारता जाधव म्हणाले, ‘काही मतदारसंघांत अडचणी असल्या तरी कार्यकर्त्यांना समजावण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे जाधव म्हणाले.