आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हातकणंगलेत NCPला उमेदवार मिळेना, 47 वर्षे राजकारण करणा-या पवारांवर नामुष्की

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- बहुचर्चित हातकणंगले लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसला लोकसभेसाठी उमेदवार मिळत नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला ही जागा काँग्रेसचे नेते कल्याणप्पा आवाडे यांना सोडण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. त्यामुळे राष्ट्रवादीने कोणत्याही तडजोडीशिवाय हा मतदारसंघ काँग्रेसला सोडण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आघाडीचा जागावाटपांचा फॉर्म्यूला 26-22 असा पुन्हा एखदा ठरला असला तरी राष्ट्रवादी 21 जागांवरच आपले उमेदवार उभे करणार आहे. दरम्यान, या घडामोडीनंतर गेली 47 वर्षे संसदीय लोकशाहीच्या राजकारणात वावरत असलेल्या शरद पवारांच्या राजकीय जीवनात अशी पहिल्यांदाच नामुष्की आली आहे. विशेष म्हणजे ही नामुष्की राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजल्या जाणा-या पश्चिम महाराष्ट्रातच आल्याने शरद पवार आणि राष्ट्रवादीच्या राजकीय भवितव्याला सुरुंग लागल्याचे मानण्यात येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस कितीही दावे करीत असले तरी राजू शेट्टींचा पराभव करणे शक्य नसल्याची जाणीव आता पक्षातील नेत्यांना होत आहे. जयंत पाटील यांनी काही दिवस राजू शेट्टींना टक्कर देण्याची तयारी दाखविली मात्र लोकसभेवर जाण्यास ते इच्छुक नसल्याने पवारही त्यांना जबरदस्ती करू शकत नाहीत. मुळातच जयंत पाटील राष्ट्रवादी सोडून काँग्रेसमध्ये जाणार अशा अफवांचा बाजार फुलत असतो. त्यामुळे जयंत पाटलांच्या इच्छेविरूद्ध पवारही भूमिका घेणार नाहीत अशी चर्चा आहे.
बीडमध्येही अशीच परिस्थिती आहे. बीडमधील बडे नेते जयदत्त क्षीरसागर यांनाही मुंडेंना टक्कर देण्यासाठी उतरविण्याचा पवाराचा मानस आहे. मात्र त्यांनीही तो हाणून पाडला आहे. क्षीरसागर आणि मुंडे यांच्यात छुपा दोस्ताना असल्याचे आता लपून राहिले नाही. त्यामुळे बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या उर्वरित नेत्यांनी क्षीरसागर यांनाच उमेदवारी द्यावी असा चंग बांधला आहे. त्यामागे काही सामाजिक व जातीय समीकरणे असल्याचे सांगितले जाते. मात्र, या डावाला बळी पडणार नसल्याची भूमिका क्षीरसागर यांनी घेतल्याचे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे. अगदी आणीबाणीची स्थिती पैदा झाल्यास क्षीरसागर पक्षाला रामराम ठोकू शकतात, असे त्यांच्या काही समर्थकांनी नाव न छापण्याच्या अटीवर माहिती दिली. तसे झाल्यास ते काँग्रेसला जवळ करू शकतात ही भीती असल्याने बीडमधून अखेर मंत्री सुरेश धस यांनाच उतरविले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबतचा सस्पेन्स आता संपणार आहे. दोन-तीन दिवसात उर्वरित जागी उमेदवारी घोषित होण्याची शक्यता आहे. कारण 3 मार्चनंतर कधीही निवडणुकीची घोषणा होऊ शकते, असे निवडणूक आयोगाकडून समजते.