आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात टीजेएसबी बँकेबाहेर सुरक्षारक्षकावर गोळीबार, दरोडेखोरांना तीन तासात अटक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील आकुर्डीतील थरमॅक्स चौकात ठाणे जनता सहकारी बँकेच्या (टीजेएसबी) संभाजीनगर शाखेत पैसे काढण्यास आलेल्या ग्राहकास लुटण्यासाठी आलेल्या दोन चोरट्यांनी बँकेच्या सुरक्षारक्षकावर गोळीबार केल्याची घटना मंगळवारी दुपारी दोन वाजता घडली. त्यानंतर तीन तासांत पुण्यातील वानवडी परिसरात चोरट्यांना अटक करण्यात आले असून जखमी सुरक्षारक्षकास खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मंगळवारी दुपारी दोन वाजता टीजेएसबी बँकेबाहेर दोन चोरटे बँकेत पैसे काढण्यास आलेल्या एका ग्राहकास लुटण्याच्या तयारीत होते. त्यानुसार त्यांनी ग्राहकास धक्काबुक्की करत त्यांच्याकडील पैशाची बॅग पळवून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुरक्षारक्षक त्याठिकाणी आल्याने, चोरट्याने रॉय नावाच्या सुरक्षारक्षकाच्या खांद्यावर गोळी मारून त्यास जखमी केले.
सुरक्षारक्षकास जखमी करून चोरटा पळू लागला असता, दुसरा सुरक्षारक्षक गणपती धसाडे याने चोरट्यावर वीट फेकून मारली. त्यामुळे घाबरलेल्या चोरट्याने पैशाची बॅग तिथेच टाकून दुचाकीवरून तो साथीदारासह पसार झाला. हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून जखमी झालेल्या सुरक्षारक्षकास खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.