आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे: उच्चशिक्षीत महिलेला लग्नाचे आमिष दाखवून 38 लाखांचा घातला गंडा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपळे निलख येथे राहणा-या एका उच्चशिक्षीत महिलेला इंग्लंडमध्ये राहणा-या एका व्यक्तीने लग्नाचे आमिष दाखवून 38 लाख रूपयांना गंडा घातल्याचे समोर आले आहे. याबाबत एका 38 वर्षीय महिलेने चतुश्रृं:गी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार डॉ. राजेंद्रकुमार या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच राजेंद्रकुमार याला मदत करणारा त्याचा साथीदार मार्टिन या व्यक्तीविरोधातही गुन्हा नोंदवला आहे. संबंधित महिलेची फसवणूक फेब्रुवारी 2015 ते जुलै 2015 या कालखंडात झाली आहे.
याबाबतची माहिती अशी की, संबंधित महिला उच्चशिक्षीत असून, एका बड्या कंपनीत कार्यरत आहे. या महिलेची काही वर्षापूर्वी पाषाण येथे राहत असताना डॉ. राजेंद्र कुमार या व्यक्तीशी ओळख झाली. आरोपीने आपण इंग्लंडमध्ये राहत असल्याचे व तेथे एका बड्या कंपनीत काम करीत असल्याचे सांगितले. यानंतर तो इंग्लंडला गेला. नंतरच्या कालखंडात आरोपी राजेंद्रकुमारने संबंधित महिलेला फोन व ई-मेलव्दारे नियमित संपर्क ठेवला.
पुढे मैत्री झाल्यावर तिचा विश्वास संपादित केला व तिच्याशी लग्न करण्याचे वचन दिले. यादरम्यान, संबंधित महिलेला बाणेर भागात मालमत्ता घेण्यासाठी बॅंक खात्यावर दीड कोटी रुपये भरत असल्याचा बहाणा केला. त्यामुळे महिला व राजेंद्रकुमार यांच्यात ऑनलाईन आर्थिक व्यवहार होऊ लागले.
पुढे आरोपींनी महिलेला गोड बोलून व वेगवेगळी कारणे सांगून तिच्या बॅंक खात्यावरील एकून 38 लाख 22 हजार 784 रुपये भरायला सांगितले. यानंतर काही महिन्यांनी राजेंद्रकुमार महिलेला टाळू लागला. महिलेने लग्नाचा तगादा लावला असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्यानंतर संबंधित महिलेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलीस निरीक्षक यु. बी. शिंगाडे पुढील तपास करत आहेत.