आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्येष्ठ गीतकार, कवी सुधीर मोघे यांचे पुण्यात निधन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- ज्येष्ठ कवी, गीतकार, संगीतकार सुधीर मोघे यांचे आज पुण्यात निधन झाले. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. तेथेच त्यांची आज प्राणज्योत मावळली. प्रदीर्घ आजाराने मोघे यांच्यावर गेले अनेक काळ उपचार सुरु होते. त्यांना अंर्धांगवायूचा झटका आला होता. तेव्हापासून ते अंथरूणालाच खिळून होते.
सुधीर मोघे यांनी मराठी चित्रपट सृष्ठीत भरीव योगदान दिले आहे. गीतकार म्हणून मोघे यांची गाणी प्रचंड लोकप्रिय ठरली. फिटे अंधाराचे जाळे, आला आला वारा, एकाच या जन्मी जणू, विसरू नका श्रीरामा मला, गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय, यांसारखी अवीट गोडी असणारी गीते मोघे यांनी लिहिली. लोकांना भावणारी गीते मोघे यांनी लिहिली. जानकी, पुढचं पाऊल, शापित, हा खेळ सावल्यांचा, कळत-नकळत, चौकट राजा, आत्मविश्वास, एक डाव भुताचा, लपंडाव, सूर्योदय अशा 50हून अधिक सिनेमांसाठी त्यांनी गीत लेखन केलं. झी मराठीवर गाजलेला 'नक्षत्रांचे देणे' या कार्यक्रमाचं यशस्वी सादरीकरणही केलं होतं.
साहित्य आणि संगीत क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी त्यांना अनेक मानसन्मान मिळाले. महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट गीतकाराचा पुरस्कार त्यांनी तब्बल चारवेळा पटकावला होता. ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांचे ते बंधू होत. त्यांच्या निधनाबद्दल साहित्य व सिनेसृष्टीतून दुःख व्यक्त करण्यात येत आहे.