आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक अधिका-याचे अपहरण केल्याप्रकरणी साता-यात काँग्रेस आमदाराला अटक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- माण तालुक्यातील आंधळी विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या पदाधिकारी निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या पी. ए. तायडे यांच्या अपहरण प्रकरणी माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांना अटक करण्यात आली आहे. अटकेनंतर प्रकृती अस्वस्थ्यामुळे आमदार गोरे यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, गोरे यांच्या अटकेने माण तालुक्यात तणावपूर्ण वातावरण असून दहिवडीसह तालुक्याच्या अनेक भागांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. या अटकेच्या निषेधार्थ आज दहिवडीत मोर्चा आणि रास्ता रोको आंदोलन करण्यात आला.
आंधळी, ता. माण येथील विकास सोसायटीच्या चेअरमन व व्हाईस चेअरमनपदांची निवड 21 एप्रिल रोजी आंधळी येथे होणार होती. आ. जयकुमार गोरे आणि त्यांचे बंधू व पंचायत समिती सदस्य शेखर गोरे यांच्यामध्ये माण तालुक्यात गेली दोन-तीन वर्षे सुरू असलेल्या सत्तासंघर्षामुळे या निवडीकडे केवळ माण तालुक्याचेच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. या निवडीसाठी लेखापरीक्षण विभागातील प्रशासकीय अधिकारी पी. ए. तायडे यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्या दिवशी दुपारी 1 च्या सुमारास निवड प्रक्रियेला सुरुवात होणार होती. मात्र, तायडे हे निवडीच्या ठिकाणी पोहोचू शकले नसल्याने त्यांचे अपहरण झाल्याची बातमी पसरली होती. त्यामुळे आंधळी व दहिवडीमध्ये तुफान दगडफेक आणि दोन्ही नेत्यांच्या समर्थकांमध्ये धुमश्‍चक्री उडाली होती.
तायडे बेपत्ता झाल्याने प्रशासकीय यंत्रणाही गडबडून गेली होती. त्यातच त्यांचे अपहरण झाल्याची धक्कादायक माहिती दुसर्‍या दिवशी समोर आली. तायडे यांनीच याबाबतची माहिती दिली होती. तायडे यांनी या प्रकरणी अमरावती येथील पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. त्यामुळे सातारा जिल्हा पोलीस प्रशासनाने त्याबाबत खातरजमा केली असता तायडे यांनी खरोखरच अपहरणाची तक्रार दिल्याचे निष्पन्न झाले. तायडे यांचे अपहरण सातार्‍यातून झाल्याने अमरावती पोलीस ठाण्याकडून हा गुन्हा सातारा शहर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला. या प्रकरणाच्या तपासाची सूत्रे पोलीस उपअधीक्षक राजलक्ष्मी शिवणकर यांच्याकडे देण्यात आली. तपासाला सुरुवात झाल्यानंतर या अपहरण नाट्यावरील पडदा उघडला गेला. या अपहरणात आमदार जयकुमार गोरे आणि त्यांच्या काही सहकार्‍यांचा समावेश असल्याचा निष्कर्ष पोलिसांनी तपासादरम्यान काढला. दरम्यान, सातारा जिल्हा बँकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून विरोधकांनी आणि पोलिसांनी गोरे यांच्या अटकेचे षडयंत्र रचले आहे. आमदार गोरे यांना अपहरण प्रकरणी बेकायदेशीररित्या अटक करण्यात आली आहे, असा दावा त्यांच्या समर्थकांनी केला आहे.