आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Madhav Bhandari News In Marathi, BJP, Divya Marathi

जनतेच्या रोषाला घाबरून मुख्यमंत्र्यांचा काढता पाय, भाजपची टिका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - नागपूर मेट्रोच्या भूमिपूजन कार्यक्रमाला अनुपस्थित राहून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विदर्भाच्या जनतेचा अपमान केला आहे, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी गुरुवारी केली. ‘लोकांना तुमची खोटी भाषणबाजी आवडत नसल्याने ते तुम्हाला बोलू देत नाहीत, यात पंतप्रधानांचा काय दोष?’ असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

सन्मान राखला जात नसल्याचा आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत कार्यक्रमाला उपस्थित न राहण्याची भूमिका मुख्यमंत्री चव्हाण व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली होती. त्याचा भाजपने कडक शब्दात निषेध केला आहे. पंतप्रधान मोदी यांची लोकप्रियता आणि कॉंग्रेसच्या आघाडी सरकारबद्दल जनतेत असलेला रोष याला घाबरुन मुख्यमंत्र्यांनी नागपुरला जाणे टाळल्याचे भाजपने म्हटले आहे.

भंडारी म्हणाले, की उरण आणि सोलापूर येथे नुकत्याच झालेल्या कार्यक्रमांमध्ये मुख्यमंत्र्यांचा कोणीही, कसलाही अवमान केला नाही. या दोन्ही कार्यक्रमांचे व्हिडीओ फुटेज पाहण्यासाठी उपलब्ध आहे. मात्र, दुष्काळ, पंधरा तासांचे भारनियमन, खड्यांचे रस्ते, बेरोजगारी आदी समस्या भोगणारी जनता मुख्यमंत्र्यांच्या तोंडून 'सर्वात पुढे महाराष्ट्र'चे खोटारडे दावे ऐकू इच्छित नाही. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरु असताना जनतेने उस्फूर्तपणे व्यत्यय आणायला सुरुवात केल्याचे ते म्हणाले.

मुख्यमंत्र्यांचा सन्मानच राखला
वास्तविक नागपूर येथील कार्यक्रम वदिर्भाच्या विकासाच्यादृष्टीने महत्वाचे होते. परंतु, मोदींचे कारण सांगून मुख्यमंत्र्यांनी वदिर्भाबद्दल त्यांच्या मनात असलेला आकसच दाखवून दिला आहे, असे भंडारी म्हणाले. "मोदींनी मुख्यमंत्र्यांना अत्यंत सभ्यतेची वागणूक दिली. भाजपच्या नेत्यांनीही त्यांचा पूर्ण सन्मान राखला," असा दावा त्यांनी केला.

अजित पवार, नितीन राऊतांचीही पाठ
मोदी यांच्या नागपूरच्या कार्यक्रमाकडे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यापाठोपाठ उपमुख्यमंत्री अजित पवार, नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांच्यासह काँग्रेस राष्ट्रवादीचे राज्यसभेतील खासदार, नगरसेवकांनी पाठ दाखवली. मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांसोबत उद‌्घाटनाला जायलाच हवे, असा काही प्रोटोकाॅल नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली.

‘अपमानित करण्याची स्ट्रॅटेजी’
‘काँग्रेसचे हरियाणातील मुख्यमंत्री भूपेंद्रसिंघ हुडा यांच्या अपमानानंतर भाजप काँग्रेस मुख्यमंत्र्यांचा अपमान करण्याची स्ट्रॅटेजी राबवत आहे. यामुळे मी नागपूरच्या कार्यक्रमाला गेलो नाही’, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी नांदेडमध्ये दिले.
मुख्यमंत्री म्हणाले म्हणाले, ‘आमचे मंत्री पंतप्रधानांचे स्वागत करतील. मोदींच्या मागच्या सर्व दौ-यात मी परळी, मुंबई, सोलापूर येथे गेलो. प्रोटोकाँलप्रमाणे विमानतळावर स्वागताला गेलो. मात्र सोलापुरला जो प्रकार घडला तो काही उचित नव्हता. तो मी विसरून गेलो. त्यानंतर हरियाणामध्येही तोच प्रकार घडला. यावरून भाजपची स्ट्रँटेजी उघड झाली आहे.’