पुणे - गेल्या पन्नास वर्षांहून अधिक काळ रसिकमनांवर अधिराज्य गाजवणारे प्रा. मधुकर तोरडमलांचे ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’ हे नाटक लवकरच रुपेरी पडद्यावर येणार आहे. नाट्यकृतीचे हे चित्रकृतीतील रूपांतर लवकरच मराठीसह हिंदी भाषेतही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
प्रा. तोरडमल यांची निर्मिती असणारे ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’ हे नाटक अर्धशतकापूर्वी रंगभूमीवर आले आणि प्रचंड लोकप्रिय झाले. स्वत: तोरडमल त्यात अभिनयाचेही रंग भरत असत. प्रेक्षकांना सतत हसवत ठेवणा-या या नाटकाने व्यावसायिक पातळीवर पाच हजार प्रयोगांची घोडदौड पूर्ण केली आहे. हे नाटक विदेशातही लोकप्रिय ठरले होते.
दमदार पटकथा अखेर तयार
प्रा. तोरडमल म्हणाले, ‘या नाटकावर चित्रपट करावा यासाठी अनेक निर्माते, दिग्दर्शकांनी मला विचारले होते; पण अपेक्षित अशी पटकथा मिळत नव्हती. शेवटी माझ्या ८३ व्या वाढदिवसाचे निमित्त साधून मी व दिग्दर्शक दिलीप भोसले यांनीच पटकथा तयार करण्याचा निर्णय केला. दिग्दर्शनही त्यांच्याकडेच सोपवले. मराठीप्रमाणेच हिंदीतही चित्रपट करण्याचे आम्ही ठरवले आहे.’
पाठपुराव्याला अखेर यश
भोसले म्हणाले, ‘गेली तीन वर्षे तोरडमल सरांकडे या नाटकावरील चित्रपटाचा पाठपुरावा करत होतो. त्यांच्या मार्गदर्शनाखाली लिहिलेल्या पटकथेचे आजवर सात ड्राफ्टस तयार झाले. त्यानंतर पटकथा तयार झाली आहे. मराठी आणि हिंदी असे दोन स्वतंत्र चित्रपट तयार होणार आहेत.’