आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंनिसची बदनामी करणाऱ्यांचा छडा लावण्यात यश; सायबरसेलकडे तक्रार दाखल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्या कार्यकर्त्यांनी दान केलेल्या गणपतीच्या मूर्ती विकल्या असल्याचे खोटे मेसेज व्हॉट्सअप, फेसबुकवरून व्हायरल करण्यात आले होते. अंनिसच्या कार्यकर्त्यांनी याप्रकरणी सायबर सेलकडे तक्रार नोंदविली आहे. त्याचबरोबर या मेसेजचा माग काढत हे खोटे मेसेज पाठविणाऱ्यांचा छडा लावण्यात यश आले आहे. 
नाशिकमधील एका संघटनेशी संबंधित असलेल्यांकडून हा मेसेज करण्यात आला आहे, संबंधितांविरूध्द कारवाई सुरू करण्यात आली आहे. अंनिसचे राज्याचे प्रधान सचिव मिलिंद देशमुख, जिल्हा कार्याध्यक्ष नंदिनी जाधव, शहर कार्याध्यक्ष श्रीपाल ललवाणी यांनी पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली.
 
अंनिसच्यावतीने गेल्या 20 वर्षांपासून पर्यावरण पूरक गणेशोत्सव हा उपक्रम राबविला जात आहे. कोल्हापूरातून सुरू झालेला हा उपक्रम आज राज्यभर जनचळवळ बनली आहे. पुण्यातील मानाच्या 5 गणेशोत्सव मंडळांनीही गणेश मुर्तींचे नदीत विसर्जन न करता कृत्रिम हौदात विसर्जन करण्याचा अभिनव पायंडा पाडला. यापार्श्वभुमीवर अंनिसची बदनामी करणारे मेसेज गणेश विसर्जनानंतर व्हायरल करण्यात आले होते. यापार्श्वभुमीवर अंनिसच्या कार्यकर्त्यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेऊन संबंधितांविरूध्द सायबर सेलकडे तक्रार दाखल केली. त्याचबरोबर स्वत: त्या मेसेजचा माग घेत शोधून काढले आहे.
 
मिलिंद देशमुख यांनी सांगितले, ‘‘गणेश विसर्जनामध्ये दान केलेल्या मुर्त्यांची विक्री करताना अंनिसच्या कार्यकर्त्यांना पकडण्यात आले. त्यांना नागरिकांनी चोप दिला. तसेच त्यांच्याविरूध्द मुंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशा प्रकारचे खोटे मेसेज व्हॉट्सअपवरून व्हायरल करण्यात आले होते. मुंढवा पोलिस ठाण्यामध्ये अशाप्रकारचा कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. तसेच संबंधित पोलिस अधिकाऱ्याचे दिलेले नावही खोटे आहे. नागरिकांनी या खोटया पोस्टवर विश्वास ठेऊ नये, तसेच अफवांना बळी पडू नये. ही फेक न्यूज प्रसारित करणाऱ्यांविरूध्द कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे. 
 
सरकारचे पाऊल योग्य
पर्यावरणपूरक गणेशोत्सवामध्ये सहभागी न होण्याविषयी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील महाविद्यालयांना देण्यात आलेले परिपत्रक हे सरकारच्या धोरणाच्या विरोधात होते. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेऊन संबंधित परिपत्रक रदद् केले. तसेच ते काढणाऱ्या अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. सरकारकडून उचलण्यात आलेले हे पाऊल योग्य असल्याचे अंनिसने म्हटले आहे.
 
 
बातम्या आणखी आहेत...