पुणे- भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे असोत अथवा माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे. जलसंपदामंत्री गिरीश महाजन असोत किंवा शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, या सर्वांवर होत असलेले आरोप हा विरोधकांच्या षड्यंत्राचा भाग आहे, असा दावा करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्वच मंत्र्यांना ‘क्लीन चिट’ दिली. या आरोपांत अजिबात तथ्य नसल्याचेही ते म्हणाले.
भाजप प्रदेश कार्यकारिणी बैठकीच्या उद्घाटन सत्रात बाेलताना फडणवीस यांनी आपल्या मंत्र्यांवर होत असलेल्या आरोपांचा समाचार घेतला. ते म्हणाले, विरोधक म्हणून आम्ही आरोप केले तेव्हा आमच्याकडे पुरावे असायचे. एकही आरोप आम्हाला मागे घ्यावा लागला नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी मात्र मीडियाचा गैरवापर करून गोबेल्स नीतीने अपप्रचार करत आहेत. या वेळी भाजपचे राष्ट्रीय नेते व्यंकय्या नायडू यांनीही एकनाथ खडसे यांचे गुणगान केले. खडसेंनी स्वत:हून राजीनामा देत आदर्श उदाहरण समोर ठेवले असल्याचे सांगून त्यांच्या आरोपातील सत्य जनतेसमोर येईल,असे ते म्हणाले.
असे आरोप...मुख्यमंत्र्यांची अशी उत्तरे...
चिक्की घोटाळा
पंकजा मुंडे यांच्याविरोधात चिक्की खरेदीत गैरव्यवहार केल्याचा आरोप झाला. मात्र, चिक्की खरेदीचा करार आमच्या सरकारने केलाच नव्हता. जुन्या सरकारच्या करारानुसार ही खरेदी झाली. उच्च न्यायालयातसुद्धा हे म्हणणे मान्य झाले.
दाऊद-गजानन पाटील
गजानन पाटील प्रकरणात खडसेंचा उल्लेखही नाही. त्यांचा या प्रकरणाशी कसलाच संबंध नसल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्या अहवालात स्पष्ट सांगितले आहे. कोर्टात हेच स्पष्ट केले तेव्हा तक्रारदाराने पुढची वेळ मागून घेतली.
खडसेंची जमीन
भोसरी‘एमआयडीसी’तील जमीन खरेदीसंबंधी मी आता सविस्तर बोलणार नाही. कारण स्वत: नाथाभाऊंनीच चौकशीची मागणी करत राजीनामा दिला आहे. परंतु, एक नक्की सांगतो की, या अग्निपरीक्षेतून नाथाभाऊ सहीसलामत बाहेर पडतील.
गिरीश महाजन यांची जमीन
लाख १२ हजार रुपयांची जमीन गिरीश महाजनांनी खरेदी केली. मी जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला. तेव्हा १८८५ पासूनच्या रेकॉर्डमध्ये ही जमीन महार वतनाची असल्याची नोंद सापडली नाही.
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)