Home »Maharashtra »Pune» Maharashtra Foundation Award Announced To Mangesh Padgaonkar

पाडगावकर, लोमटे यांना फाउंडेशन पुरस्कार जाहीर

प्रतिनिधी | Dec 24, 2011, 04:24 AM IST

  • पाडगावकर, लोमटे यांना फाउंडेशन पुरस्कार जाहीर

पुणे- महाराष्ट्रातील साहित्य आणि सामाजिक क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेचा मानल्या जाणा-या महाराष्ट्र फाउंडेशनच्या (अमेरिका) पुरस्कारांची शुक्रवारी येथे घोषणा करण्यात आली.
या वर्षीचा साहित्य जीवनगौरव पुरस्कार कवी मंगेश पाडगावकर यांना तर समाजकार्य जीवनगौरव पुरस्कार डॉ. जी. जी. पारीख यांना जाहीर झाला आहे. प्रत्येकी दोन लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे. वनराईचे संस्थापक अध्यक्ष मोहन धारिया आणि साधना ट्रस्टचे विश्वस्त प्रा. रा. ग. जाधव यांनी येथे पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. सुनीती सु. र. (पुणे), सुभाष लोमटे (औरंगाबाद), ब्रायन लोबो (ठाणे) यांना अनुक्रमे समाजप्रबोधन, असंघटित कष्टकरी आणि सामाजिक प्रश्न या क्षेत्रातील कार्याबद्दल कार्यकर्ता पुरस्कार जाहीर झाले आहेत. प्रत्येकी 50 हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे. याशिवाय मंगेश काळे (ललित लेखन), सतीश काळसेकर (अपारंपरिक ग्रंथ), मंगला आठलेकर (वैचारिक ग्रंथ), ज्योती म्हापसेकर व नीलिमा मिश्रा (सामाजिक कार्य विशेष पुरस्कार), चंद्रकांत वानखेडे व अचला जोशी (विशेष ग्रंथ पुरस्कार), सुषमा देशपांडे (नाट्य पुरस्कार) यांनाही सन्मानित करण्यात येणार आहे. प्रत्येकी 25 हजार रुपये आणि मानचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे.
पुरस्कार निवड समितीमध्ये मोहन धारिया, भाई वैद्य, विलास वाघ, विजया चौहान, विजय दिवाण, विलास गोंगाडे, सुभाष वारे, रा. ग. जाधव, नागनाथ कोत्तापल्ले, निशिकांत मिरजकर, वसंत डहाके,, प्रज्ञा दया पवार, माधुरी पुरंदरे, माधव वझे, सुरेशचंद्र पाध्ये अशा मान्यवरांचा समावेश होता.
त्यांनी शिफारस केलेल्या प्रत्येकी तीन नावांपैकी अंतिम निवड अमेरिकेतील सुनील देशमुख, दिलीप चित्रे, विद्युल्लेखा अकलूजकर, रजनी शेंदुरे, शोभा चित्रे यांच्या समितीने केली. एकूण सहा साहित्य, सहा समाजकार्य तर एका नाट्य पुरस्काराचा यात समावेश आहे. पुरस्कारांचे वितरण 13 जानेवारीला राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण व ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांच्या उपस्थितीत होणार आहे, असे धारिया व जाधव यांनी सांगितले.

Next Article

Recommended