आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या नव्या उपग्रह निर्मितीसाठी ५० लाख

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - ‘स्वयंम’ उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेच्या (सीओईपी) सौरऊर्जेवर चालणाऱ्या दुसऱ्या उपग्रहाच्या निर्मितीसाठी तंत्रशिक्षण विभाग ५० लाख रुपये देणार असल्याची घोषणा राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शुक्रवारी केली.

‘सीओईपी’च्या मिशन स्वयंममधील सहभागी विद्यार्थी व शिक्षकांचा सत्कार तावडे यांच्या हस्ते पुण्यात करण्यात आला. या वेळी तावडे बोलत होते. “स्वयंम उपग्रहाची निर्मिती करून सीओईपीच्या विद्यार्थ्यांनी राज्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. इस्रोच्या शास्त्रज्ञांच्या कल्पनेपलीकडे असणारे काम विद्यार्थ्यांनी करून दाखवले. सीओईपी विद्यार्थ्यांच्या आठ वर्षांच्या सततच्या धडपडीमुळे हे शक्य झाले. पैशासाठी संशोधनाचे कोणतेही काम थांबू नये ही तंत्रशिक्षण विभागाची भूमिका अाहे,’ असेही ते म्हणाले.‘स्वयंम’ प्रकल्पाचा प्रमुख धवल वाघुल्दे यांनी सुरुवातीला प्रकल्पाच्या माहितीचे सादरीकरण केले.

‘बालभारती’चे कॉफी टेबल बुक : महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाच्या (बालभारती) सुवर्ण महोत्सवानिमित्त ‘बालभारती’ व शिवाजी महाराजांवर आधारित कॉफी टेबलबुकची निर्मिती केली जाणार आहे. ‘बालभारती’च्या नियामक मंडळाच्या बैठकीत तावडेंनी हा निर्णय जाहीर केला. शिक्षण विभागाचे आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, पाठ्यपुस्तक मंडळाचे संचालक सुनील मगर, माध्यमिक विभागाचे शिक्षण संचालक एन. के. जरग, पाठ्यपुस्तक नियामक मंडळाचे नियंत्रक व्ही. व्ही. गोसावी यांच्यासह मंडळाचे सदस्य बैठकीस होते.

‘दहावी’चा टक्का वाढविण्यासाठी : राज्यातील १६७ शाळांचे दहावीचे निकाल अत्यंत कमी लागले आहेत. या शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठक तावडे यांनी घेतली. ‘ या शाळांना शैक्षणिक साहित्य, शिक्षकांना विशेष प्रशिक्षण देणार अाहाेत. या शाळांच्या निकालात ५० टक्क्यांची वाढ करण्यासाठी प्रयत्न करावेत’, असे आवाहन तावडे यांनी केले.
बातम्या आणखी आहेत...