आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विजय-अभिजितमध्ये लढत: आज ठरणार महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - महराष्ट्र केसरी किताबाच्या हॅट््ट्रिकसाठी सज्ज असलेल्या जळगावच्या विजय चौधरीसमोर शनिवारी पुण्याचा युवा मल्ल अभिजित कटकेचे तगडे आव्हान असेल. गादी विभागाच्या अंतिम फेरीत अभिजितने लातूरच्या सागर बिराजदारला पराभूत करत स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आणले. रोमांचक लढतीत अभिजितने २-१ ने विजय मिळवला. त्याने पहिल्यांदाच महाराष्ट्र केसरीच्या फायनलमध्ये प्रवेश केला. माती गटातून विजय चौधरीने जालन्याच्या विलास डोईफोडेला सहज पराभूत करत सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला. महाराष्ट्र केसरीची किताबी लढत शनिवारी सायंकाळी होईल.

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या आणि पुणे शहर राष्ट्रीय तालीम संघाच्या मान्यतेने होत असलेली ही स्पर्धा कै. आमदार रमेशभाऊ वांजळे क्रीडानगरीत सुरू आहे. संध्याकाळच्या सत्रातील गोकुळ वस्ताद तालमीचा मल्ल सागर बिराजदार विरुद्ध मुंबईच्या गणेश जगताप यांच्यात गादीवरील पहिल्या उपांत्य लढतीत बचावात्मक खेळण्याच्या नादात सागर काहीसा पिछाडीवर पडला होता. गणेशने पहिल्या फेरीत त्याच्यावर ६-३ अशी आघाडी घेतली. मात्र, दुसऱ्या फेरीत सागरने आपला अनुभव पणाला लावून अाक्रमक खेळत तीन गुण वसूल केले. निर्णायक क्षणी सागरने भारंदाज डाव टाकत सहा गुणांची कमाई करत लढत निकाली काढत अंतिम फेरी गाठली.

दुसऱ्या उपांत्य लढतीत अभिजित कटके आणि मुंबईच्या समाधान पाटील यांच्यात मुख्य रोमांचक लढत ३-३ ने बरोबरीत सुटली. पिछाडी भरून काढल्याच्या नियमानुसार अभिजितला विजयी घोषित करण्यात आले.

माती विभागातील पहिल्या उपांत्य फेरीत विलास डोईफोडेने लातूरच्या ज्ञानेश्वर गोचडेचे आव्हान चितपट करत संपुष्टात आणले. विशेष म्हणजे लढतीत ज्ञानेश्वरने विलासवर गुणांची मोठी आघाडी होती. निष्कारण घाई करण्याचा फटका ज्ञानेश्वरला बसला. विलासने संधी साधत त्याला चितपट केले. मातीवरील दुसऱ्या उपांत्य लढतीत विजय जाधव सहज विजयी झाला. त्याला प्रतिस्पर्धी मारुती जाधव फारसे आव्हान देऊ शकला नाही. विजयने गुणांवर सहज लढत जिंकली.
बातम्या आणखी आहेत...