आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दाेन दिवसांत मान्सून घेणार महाराष्ट्रातून काढता पाय !

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - येत्या दोन-तीन दिवसांत महाराष्ट्रातून नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा (मान्सून) परतीचा प्रवास सुरू होण्यासाठी अनुकूल हवामान स्थिती निर्माण झाली आहे. गुरुवारी गुजरात आणि मध्य प्रदेशाच्या बहुतांश भागांतून मान्सून माघारी फिरला.
गेल्या २४ तासांत कोकण-गोवा व मध्य-महाराष्ट्रात झालेल्या तुरळक पावसाचा अपवाद वगळता उर्वरित राज्यातील हवामान कोरडे होते. येत्या दोन दिवसांत दक्षिण कोकण, गोवा आणि दक्षिण मध्य-महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. उत्तर कोकण, उत्तर मध्य-महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. येत्या १५ ऑक्टोबरनंतर राज्यातील हवामान कोरडे राहणे अपेक्षित आहे.
१५ सप्टेंबरला पश्चिम राजस्थानातून माघारी फिरलेल्या मान्सूनचा प्रवास ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत रखडला होता. अाठ ऑक्टोबरनंतर मान्सूनचा परतीचा प्रवास पुन्हा सुरू झाला. गुरुवारपर्यंत संपूर्ण राजस्थान, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर तसेच उत्तर प्रदेश, गुजरात आणि मध्य प्रदेशच्या बहुतांश भागातून मान्सूनने काढता पाय घेतला. पुढच्या ४८ तासांतही मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू राहणार आहे.

‘ऑक्टोबर हीट’ गायबच
ऑक्टोबरचा पहिला पंधरवडा संपत आला तरी मान्सूनचा मुक्काम असल्याने राज्यात अनेक ठिकाणी दिवसातले अनेक तास ढगाळ- पावसाळी हवा आणि हलका पाऊस अशी स्थिती आहे. त्यामुळे ‘ऑक्टोबर हीट’चा कडाका म्हणावा तितका राज्याला अद्याप जाणवलेला नाही. गेल्या २४ तासांतली राज्यातील किमान तापमानाची नोंद मालेगाव व नगर येथे प्रत्येकी १७ अंश सेल्सियस होती, तर कमाल तापमान पुण्यात ३६ अंश सेल्सियस नोंदले गेले. राज्यातल्या बहुतांश जिल्ह्यांमधले कमाल तापमान ३० ते ३५ अंश सेल्सियसदरम्यान राहिले.
यायला उशीर; जायलाही उशीर
दरवर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात तळकोकणात दाखल होणारा मान्सून यंदा १९ जूनला महाराष्ट्रात आला. गेले ११७ दिवस त्याने महाराष्ट्रात मुक्काम ठोकला आहे. दरवर्षी साधारणतः १५ ऑक्टोबरच्या सुमारास संपूर्ण महाराष्ट्रातून मान्सून परत फिरलेला असतो. या वेळी मान्सून जाण्याची नेहमीची तारीख काही दिवसांनी पुढे जाताना दिसते आहे.
बातम्या आणखी आहेत...