आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सांस्कृतिक अधिपत्याचे मार्ग भाषेतून, पुरस्कार वितरण कार्यक्रमात डॉ. कोत्तापल्ले यांचे मत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - ‘सांस्कृतिक संघर्षाचे मार्ग भाषेतून वाट काढतात. त्यामुळे कोणत्याही वातावरणात वा परिस्थितीत भाषेची जपणूक महत्त्वाची आहे’, असे मत माजी साहित्य संमेलनाध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी मंगळवारी व्यक्त केले. भाषाविषयक आपला संकोची व कमीपणाची मानसिकता अनाकलनीय आहे, अशी टीप्पणीही त्यांनी केली.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या 108 व्या वर्धापनदिनी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्र. चिं. शेजवलकर, कार्याध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांच्यासह मसाप सन्मानप्राप्त लेखक डॉ. द. ता. भोसले आणि भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कार विजेते विजय दांडेकर व्यासपीठावर उपस्थित होते. डॉ. कोत्तापल्ले यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. डॉ. पुष्पा गावित यांना तसेच सोलापूर मसाप शाखेला सवरेत्कृष्ट शाखेचा राजा फडणीस करंडक प्रदान करण्यात आला.
डॉ. कोत्तापल्ले म्हणाले, सांस्कृतिक संघर्ष जगभर सुरू असतात. त्यामुळे सांस्कृतिक राजकारण आकार घेत असते. सत्तेसाठी स्थानिक भाषा अवगत करणे आवश्यक असते कारण सांस्कृतिक सत्तेचे मार्ग भाषेतून जात असतात. इंग्रजांनी सुरुवातीला आपल्या देशात हेच धोरण ठेवले होते. आपण मात्र भाषा आणि संस्कृतीच्या बाबतीत आत्मविश्वास गमावलेली माणसे आहोत की काय, अशी शंका येते.
डॉ. भोसले म्हणाले, पाश्चात्त्यांचे अतिक्रमण आणि अंधानुकरण करताना आपल्याला विवेक राहिलेला नाही. सर्वत्र व्यापारी मनोवृत्ती आणि यांत्रिकीकरण बोकाळले आहे. र्शमाची प्रतिष्ठा उरलेली नाही. उपयोग आणि उपभोग हीत संस्कृती बनली आहे.
साहित्यसंस्थांचे मिळून महामंडळ असावे
मराठीसाठी कार्यरत असणार्‍या, संमेलने भरवणार्‍या, युवा-नवोदित लेखकांना प्रोत्साहन देणार्‍या पण विखुरलेल्या सार्‍या साहित्यसंस्थांना एकत्र आणून साहित्य महामंडळ स्थापन करावे, अशी सूचना डॉ. भोसले यांनी केली. तसेच मराठीच्या जतन व प्रसारासाठी अनुवाद अकादमीची गरज आहे. ललित लेखनाप्रमाणेच शास्त्रीय व वैचारिक लेखनाचाही अनुवाद होणे आवश्यक असल्याचे मत मांडले. भाषेचे संस्कार मुलांवर होण्यासाठी त्यांना भाषा शिकवणार्‍या शिक्षकांचे आधी उत्तम प्रशिक्षण गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.