आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra Sahitya Parishad Election Issue At Pune

मसापच्या मतदार यादीत ‘दिवंगत’ही; सुनील महाजनांनी लेखी आक्षेप नोंदवला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- महाराष्ट्र साहित्य परिषदेची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यावर उपलब्ध करण्यात आलेल्या मतदारयादीत चक्क ‘दिवंगत’ मतदारांचीही नावे समाविष्ट करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याबाबतीत परिषदेच्या एका पदाधिकाऱ्यानेच आक्षेप नोंदवला आहे. तसेच मुख्य निवडणूक अधिकारी अॅड. प्रताप परदेशी यांच्याकडे लेखी तक्रारही केली आहे. त्यामुळी ही प्रक्रिया वादात सापडली आहे.

दोन वर्षांपूर्वी निधन पावलेले ‘वनराई’चे अध्यक्ष मोहन धारिया यांचे नाव या सुधारीत मतदारयादीत १८१ क्रमांकावर अद्याप आहे. त्याचप्रमाणे ज्येष्ठ क्रीडातज्ज्ञ बाळ. ज. पंडित, ग्राहक पंचायतीचे संस्थापक बिंदूमाधव जोशी, हिंदू महासभेच्या हिमानी सावरकर, प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशनचे शशिकांत कुलकर्णी, इंद्रायणी प्रकाशनाचे श्याम कोपर्डेकर, राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक ज्ञानेश्वर भणगे, राजस साठे, जयंत बेंद्रे अशा दिवंगत झालेल्या अनेकांचा मतदारयादीत मतदार म्हणून समावेश आहे. या सर्व मान्यवरांचे निधन झाल्याच्या बातम्या सर्व माध्यमांतून ठळकपणे प्रकाशित झाल्या आहेत. त्यांना मसापतर्फे श्रद्धांजली देखील वाहण्यात आली आहे. तरीही या सर्व मान्यवरांची नावे अद्याप मतदारयादीत कायम असल्याने सखेद आश्चर्य वाटल्याचे सुनील महाजन यांनी नोंदवली.

मसापची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून १५ मार्च २०१६ रोजी नवी कार्यकारिणी अस्तित्वात येणार आहे. या निवडणुकीसाठी मतदारयादी तयार करून ती निवडणूक अधिकाऱ्यांकडे नुकतीच सुपूर्द करण्यात आली आहे. परिषदेचे कार्यक्षेत्र असलेल्या १३ विभागांतून एकूण ११ हजार २७७ आजीव सभासद या निवडणुकीसाठी मतदार असतील.