आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यंदाचे साहित्य संमेलन पंजाबमध्ये

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - मराठी सारस्वतांचा मेळा यंदा प्रथमच मराठी भूमीपासून दूर पंजाबमध्ये भरत आहे. गुरुदासपूर जिल्ह्यातील घुमान या गावी 88 वे अ.भा. मराठी साहित्य संमेलन होणार आहे. अ.भा. मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी मंगळवारी ही घोषणा केली. फेब्रुवारी 2015च्या दुसर्‍या आठवड्यात हे संमेलन होईल.

संमेलनासाठी महामंडळाकडे 10 निमंत्रणे होती. बृहन्महाराष्ट्रात संमेलन व्हावे यावर मतैक्य झाल्याने पंजाबची निवड करण्यात आली. उस्मानाबाद येथेही समितीने पाहणी केली होती. ज्या संत नामदेवांनी भागवत धर्माचा पाया रचला त्या धर्माची पताका घेऊन वारकरी पंढरीच्या वाटेवर असतानाच नामदेवांच्या कर्मभूमीत हे संमेलन घेण्याची घोषणा झाली हे विशेष. पुण्यातील सरहद संस्थेचे संजय नहार व उद्योगपती भारत देसलडा यांच्या वतीने घुमानचे निमंत्रण होते. मराठीला सातशे वर्षांपूर्वीच महाराष्ट्रापार नेण्याचे महत्कार्य संत नामदेवांनी केले. तेथे संमेलन होत असून महाराष्ट्राचे वारकरी व पंजाबच्या धारकर्‍यांत नवा संवाद जन्म घेईल, अशी प्रतिक्रिया या दोघांनी दिली.

महामंडळ - निमंत्रकांत ताळमेळ नाही
मराठी साहित्य संमेलनाचे दान निमंत्रण पाठवणार्‍या कुठल्या संस्थेच्या पदरात पडणार, याची कल्पना महामंडळाची आजची बैठक संपेपर्यंत कुणालाच नव्हती, असे महामंडळाचे म्हणणे होते. मात्र बैठक सुरू असतानाच दुपारी पावणेदोनच्या सुमारास काही वाहिन्यांवर संमेलन पंजाबमधील घुमान येथे, अशी ब्रेकिंग न्यूज झळकू लागली. खुद्द घुमान येथील संमेलनाचे निमंत्रक असणारे संजय नहार व भारत देसलडा यांनीही आम्हाला अद्याप महामंडळाकडून कुठलीही अधिकृत माहिती नसल्याचे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. त्यामुळ महामंडळ आणि निमंत्रक यांच्यात सुरवातीपासूनच संवाद नसल्याचे चित्र समोर आले. याविषयी महामंडळाकडे विचारणा केल्यावर बुधवारी निमंत्रकांना अधिकृत पत्र दिले जाईल, असा खुलासा करण्यात आला. मात्र त्यापूर्वीच कुठलेही अधिकृत मान्यतापत्र नसताना निमंत्रकांनी वाहिन्यांना मुलाखतीही दिल्या होत्या.

विश्व संमेलन जोहान्सबर्गला
आयोजकांनी असमर्थता दाखवल्याने टोरँटो संमेलन रद्द करण्याची नामुष्की मंडळावर आली होती. पुढे दोन वर्षे निमंत्रण आले नाही. द. अफ्रिकेतून उत्कर्ष प्रोजेक्टसच्या राजू तेरवाडकर यांनी आता जोहान्सबर्ग येथे चौथे विश्व संमेलन घेण्याची तयारी दाखवली आहे. 2015 च्या मार्चमध्ये ना.धों. महानोर यांच्या अध्यक्षतेखाली संमेलन होईल.

घुमानमध्ये बाबा नामदेव गुरुद्वारा
गुरुदासपूर जिल्ह्याच्या घुमान येथे संत नामदेवांनी (1270-1350) वयाच्या 55 व्या वर्षांनंतर कार्य केले. शिखांच्या पवित्र गुरू ग्रंथसाहिबमध्ये त्यांचे अभंग आहेत. नामदेव हे मूळ हिंगोली जिल्ह्यातील नरसीचे. घुमान येथे 14 शतकात उभारलेले गुरुद्वारा दरबारसाहिब हे नामदेवांचे धार्मिक स्थळ आहे. येथे एक पवित्र सरोवर आहे. माघ प्रतिपदा व द्वितीयेला या ठिकाणी दरवर्षी यात्रा भरते.