आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साखर कारखाने अडचणीत; वेतन कराराचे आव्हान : पवार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - "दुष्काळामुळे ऊस लागवड मोठ्या प्रमाणात घटली. त्यामुळे यंदा मराठवाड्यातल्या ६० ते ७० कारखान्यांपैकी केवळ पाच कारखानेच सुरू राहतील. सोलापुरातही अशीच स्थिती असेल. कारखान्यांपुढे आर्थिक संकट उभे असल्याने यातून कामगारांच्या वेतन कराराचा प्रश्न मार्गी लावावा लागेल,' अशी चिंता माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी मंगळवारी पुण्यात व्यक्त केली.

महाराष्ट्रातील साखर कामगार संघटनांच्या सुधारित वेतन कराराबाबत साखर संघ आणि साखर कामगारांच्या प्रतिनिधींची बैठक पवार यांच्या अध्यक्षतेखाली साखर संकुल येथे झाली. त्यानंतरच्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, राज्य शासनाच्या वेतन करार समितीचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील यांच्यासह साखर कारखान्यांचे प्रतिनिधी या वेळी उपस्थित होते.

"साखर कामगारांचा वेतन करार दोन वर्षांपूर्वी संपलेला आहे. सुधारित वेतन करारासाठी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. त्याबाबत समितीने कामगार आणि संघाच्या प्रतिनिधींशी चर्चा केल्यानंतर त्यांच्यात तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे या दोन्ही संघटनांनी आपल्याशी चर्चा करून निर्णय घेण्यासाठी ही बैठक बोलावली होती,' असे पवार यांनी सांगितले. सध्याची कारखान्यांची आर्थिक स्थिती पाहता अनेक अडचणी आहेत. कामगारांच्याही मागण्या रास्त आहेत. त्यामुळे कामगारांच्या हिताला बाधा पोहोचणार नाही, अशी भूमिका घेण्यासाठी दोन्ही बाजूंनी सद्य:स्थिती मांडली असे ते म्हणाले.

यंदा ऊस उपलब्धता नसल्याने अनेक कारखाने बंद राहणार आहेत. सोलापूर जिल्ह्यातील ३७ पैकी केवळ ४ ते ५ कारखाने सुरू राहतील. मराठवाड्यातील ६० पैकी ५ कारखानेच सुरू होतील. ही स्थिती आणि कारखान्यांची आर्थिक क्षमता लक्षात घेऊन वेतन कराराचा तोडगा काढणार असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.

थकीत रकमेचा प्रश्न
शेतकऱ्यांच्या ऊस बिलाची थकीत रक्कम देण्याबाबत लवकरच योग्य निर्णय घेणार असल्याचे पवार म्हणाले. जवळपास ८० टक्क्यांहून अधिक कारखान्यांनी थकीत देणी दिली आहेत. शेतकऱ्यांना १०० टक्के बिले देण्याबाबत कारखाने तयार आहेत. मात्र, शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी एक हप्ता हवा असतो. आता हप्ता दिल्यास दिवाळीत देता येणार नाही. याबाबत चर्चा असल्याचे त्यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...