आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे - जागतिक पर्यटन दिवसाचे औचित्य साधून दरवर्षी युनेस्कोच्या वतीने जाहीर करण्यात येणारी थीम प्रथमच बाजूला सारून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) महिला आणि सुरक्षा या थीमवर लक्ष केंद्रित केले आहे. यंदा एमटीडीसीच्या वतीने राज्यात अनेक ठिकाणी महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा अधोरेखित करण्यात येणार आहे.
युनेस्कोच्या वतीने दरवर्षी 27 सप्टेंबर या दिवशी जागतिक पातळीवर एक मध्यवर्ती संकल्पना जाहीर केली जाते. त्या थीमनुसार त्या त्या वर्षी जगभर पर्यटनविषयक उपक्रम राबवले जातात. या वर्षी युनेस्कोचे जनरल सेक्रेटरी बान की मून यांनी ‘टुरिझम अँड वॉटर : प्रोटेक्टिंग अवर कॉमन फ्यूचर’ अशी थीम जाहीर केली आहे. त्यामुळे जगभरातील पर्यटनविश्वात जल वापर, जल बचत, जल व्यवस्थापन आणि जल जतन या मुद्द्यांवर आधारित कार्यक्रम होणार आहेत. दरवर्षी भारतातही अशा मध्यवर्ती थीमला अनुसरूनच उपक्रम आखले जातात.
परंपरेला यंदा छेद
या परंपरेला प्रथमच छेद देत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने महिला आणि सुरक्षेचा मुद्दा पर्यटनविषयक उपक्रमांच्या केंद्रस्थानी आणला आहे. याविषयी एमटीडीसीच्या महासंचालक किशोरी गद्रे म्हणाल्या, जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून या दिवशी पर्यटनविश्वातील अनेक घटक एकत्र येतात. पर्यटन क्षेत्रात महिलांची सुरक्षा हा ऐरणीवरचा मुद्दा आहे. कारण आजही आपल्याकडे एकटीदुकटी महिला पर्यटनाला जाताना दिसत नाही. पर्यटनाचे क्षेत्र महिलांसाठी सुरक्षित करण्याचा संकेत यानिमित्ताने देण्याचा एक प्रयत्न म्हणून या वर्षी जागतिक थीम न स्वीकारता आपल्यापुरता वेगळा विषय टुरिझम डे सेलिब्रेशनसाठी निवडला आहे. महाराष्ट्रापुरती या वर्षी महिला आणि सुरक्षा अशी मध्यवर्ती कल्पना घेऊन विविध पर्यटनविषयक उपक्रमांचे आयोजन केले आहे.
पथनाट्यातून जागृती
जागतिक पर्यटन दिनाची थीम बाजूला ठेवून या वर्षी राज्यात महिलांची सुरक्षा हा विषय मध्यवर्ती धरून विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. यानिमित्ताने राज्याच्या विविध भागांत दोन ते तीन दिवसांचे कार्यक्रम घेण्यात येत आहेत. शिबिरे, कार्यशाळा, पथनाट्ये यांचा त्यात समावेश आहे.
किशोरी गद्रे, महासंचालक, एमटीडीसी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.