आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mahatma Gandhi 1919 Swadesh, Narendra Modi 2013 Hindu Nationalist

महात्मा गांधी 1919- स्वदेशी; नरेंद्र मोदी 2013 - हिंदू राष्‍ट्रवादी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - महात्मा गांधी यांनी 1919 मध्ये ज्या सभागृहातून देशाला स्वदेशीची हाक दिली, त्या ऐतिहासिक एन.एम. वाडिया अ‍ॅम्फी थिएटरच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले असून गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी या इमारतीचे उद्घाटन होणार आहे. फर्ग्युसन कॉलेजच्या शताब्दी वर्षानंतर 1985 मध्ये राजीव गांधी यांच्या हस्ते थिएटरच्या जीर्णोद्धाराचे उद्घाटन करण्यात आले होते.


लोकमान्य टिळक, आगरकर, विष्णुशास्त्री चिपळूणकर आदींनी स्थापन केलेल्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या फर्ग्युसन कॉलेजच्या अ‍ॅम्फी थिएटरला गतवर्षी शंभर वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले होते. स्वातंत्र्य चळवळीची साक्षीदार ठरलेल्या या वास्तूला सरकारने ‘हेरिटेज ए’चा दर्जा दिला आहे. रवींद्रनाथ टागोर, पं. नेहरू, सी.व्ही. रामन, जगदीशचंद्र बोस, मदनमोहन मालवीय यांनी येथे विचार मांडले होते. मोदींची आज पुण्यात सभा.


1.75 कोटी खर्च
शंभरी पार केलेल्या या वास्तूच्या मूळ प्रतिमेला धक्का न लावता नवे रूप देण्यासाठी 1 कोटी 75 लाख रुपये खर्च झाला आहे. देणग्यांमधून हा खर्च करण्यात आला. 1912 मध्ये सर जिजीभॉय यांनी दिलेल्या 25 हजार व प्रिन्स आगाखान यांच्या 5 हजारांच्या देणगीतून थिएटरची उभारणी झाली होती. पुण्यातील धनिकांनीही आर्थिक मदत दिली होती.


व्याख्याने, संगीत, नाटकांचे साक्षीदार
०1927 मध्ये देशातली पहिली भारतीय महिला परिषद झाली.
०माजी पंतप्रधान व्ही.पी. सिंग, पी.व्ही नरसिंह राव हे फर्ग्युसन कॉलेजचे विद्यार्थी. सरोजिनी नायडू, यशवंतराव चव्हाणांची भाषणे.
०केरळचे तेव्हाचे मुख्यमंत्री नंबुद्रीपाद यांचे ‘स्वातंत्र्य’वर व्याख्यान
०कुमार गंधर्व, आचार्य अत्रे, पु. ल. देशपांडे, भालबा केळकर, भास्कर चंदावरकर, रोहिणी भाटे, वसंतराव देशपांडे यांचे कार्यक्रम.
०पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेची सुरुवात येथेच झाली.


ही संघाचीच योजना
संकुचित विचाराच्या माणसाला शैक्षणिक संस्थांनी बोलावणे चुकीचे आहे. या संस्था घटनेप्रमाणेच चालल्या पाहिजेत. ‘फर्ग्युसन’वर संघाचा प्रभाव असल्याने मोदींना बोलावले. रा. स्व. संघाचीही ही योजना आहे.
डॉ. कुमार सप्तर्षी, ज्येष्ठ विचारवंत


वेगळा हेतू नाही
यापूर्वी प्रतिभाताई पाटील, शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण आदी येऊन गेले. आता मोदींना बोलावले इतकेच. यामागे राजकीय भूमिका किंवा वेगळा हेतू असण्याचे कारणच नाही.
विकास काकतकर, उपाध्यक्ष, डेक्कन एज्युकेशन सोसायटी.