आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गांधीजींच्या स्वप्नातील शाळा पुण्यात!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - बालवयात ज्ञान प्राप्त करण्यासाठी कोणत्याही प्रकारची मर्यादा न राहता आपल्या क्षमता, अभिरुची व आवडीनिवडीनुसार शिक्षण घेणे मुलांना आवडत असते. अशीच महात्मा गांधींच्या स्वप्नातील बिनभिंतीची शिक्षणाची प्रयोगशाळा पुण्यात ग्राममंगलच्या माध्यमातून सुरू आहे.
या मराठी माध्यमाच्या शाळेत पहिली ते दहावीचे वर्ग असून सध्या 62 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. महाराष्टÑ राज्य माध्यमिक संचालनालयाच्या पुस्तकांशिवाय या ठिकाणी इतर अभ्यासक्रमाचे धडेही दिले जातात. मूल व शाळेचे नाते दीर्घकाळ राहून अभ्यासाबाबत मुलांमध्ये गोडी निर्माण करण्यासाठी विविध माहितीपर प्रयोग राबवणे, मुलांचे स्वातंत्र्य, सहज स्वभाव, गती, क्षमता लक्षात घेऊन मुले विकसित करण्यासाठी शाळा, घर व मूल यात आनंदी सहसंबंध निर्माण करण्याचे काम येथील शिक्षक करत असतात.
मुलांमध्ये आत्मविश्वास, निर्णयक्षमता, प्रश्न सोडवणे, वैज्ञानिक दृष्टिकोन, पर्यावरणाशी नाते, सामाजिकता व मूल्यांची जाणीव सहजतेने व विविधांगाने होण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातात. तसेच शिक्षण व दैनंदिन व्यवहार यांची सांगड घालून शिक्षण जीवनोपयोगी करण्याचाही या शाळेचा प्रयत्न असतो. तणावरहित शिक्षण देताना मुलांच्या भावनिक, बौद्धिक, सामाजिक संवेदना ओळखून त्यांना नाट्य, चित्रकला, संगीत, नृत्य व वाचन कट्टा याबाबतचे अधिक मार्गदर्शनही केले जाते. दरवर्षी वार्षिक परीक्षा न घेता प्रत्येक मुलाच्या विकासाची नोंद करून त्यास शिकवले जाते व दहावीला 17 नंबरचा फॉर्म भरून त्यास परीक्षेस बसवले जाते. अशा अनोख्या शाळेत साहजिकच मुले रमतात व विकसित होऊन जीवनात यशस्वी होतात.
अनुदान नको, मान्यता द्या
महात्मा गांधींचे शिक्षणाबाबतचे विचार एकमेवाद्वितीय होते, त्यास जगभर मान्यता मिळाली होती. श्रम व बुद्धी यांची फारकत न करता सरकारशिवाय शिक्षण देता आले पाहिजे ही गांधीजींची भूमिका होती. ज्ञानाची अमर्याद प्राप्ती करण्याची क्षमता मुलांत असताना ती मर्यादित ठेवू नये हे गांधीजींच्या ‘नई तालीम’ मधील विचार आजच्या काळातही रास्त ठरतात. राष्टÑबांधणीकरिता शिक्षण आवश्यक असून भावी नागरिकांत बंधुभाव निर्माण करणे हे त्याचे ध्येय आहे. राज्य शासनाने या अभिनव शाळेस अनुदान द्यावे, अशी आमची मागणी नसून विद्यार्थी हितासाठी मान्यता द्यावी असा आग्रह आहे, असे मत महात्मा गांधी भवनचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी यांनी व्यक्त केले.