आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mahatma Gandhi's Death Anniversary Program In A Variety Of Pune

‘नथुराम शौर्य दिना'ची फक्‍त अफवा, महात्‍मा गांधी पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- महात्मा गांधी यांची 67 वी पुण्यतिथी नथुराम गोडसे याच्या स्मरणार्थ ‘शौर्य दिन' म्हणून साजरा केला जाणार असल्याची चर्चा गेले काही दिवस सुरू होती. सोशल मीडियातूनही याचा प्रसार झाला होता. प्रत्यक्षात शौर्य दिनाची नुसती आवईच असल्याचे शुक्रवारी (ता. 30) स्पष्ट झाले. गांधी पुण्यतिथीचे कार्यक्रम मात्र सालाबादाप्रमाणे पुण्यात अनेक ठिकाणी घेण्यात आले.

नथुराम गोडसेंचे वंशज पुण्यात वास्तव्यास आहेत. नथुरामाच्या अस्थींचा कलश त्यांच्या नातेवाइकांनी सांभाळून ठेवला आहे. हा कलश गांधी पुण्यतिथीच्या दिवशी कपाटबंदच होता. त्याचे कोणतेही उदात्तीकरण करण्यात आले नाही. गोडसेंच्या नावाने कोणताही कार्यक्रम पुण्यात घेतला गेला नाही. पोलिस यंत्रणांनाही या प्रकारच्या कार्यक्रमाची नोंद झाली नसल्याचे सांगितले. हिमानी सावरकर या नथुराम गोडसे यांचे धाकटे बंधू गोपाळ गोडसे यांच्या कन्या आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे बंधू नारायण सावरकर यांचे बंधू नारायण सावरकर यांच्या त्या स्नुषा आहेत. सध्या त्या हिंदू महासभेच्या अध्यक्ष म्हणून काम पाहतात. गांधी यांची पुण्यतिथी नथुरामच्या स्मरणार्थ ‘शौर्य दिन’ म्हणून साजरा होणार असल्याच्या चर्चेचे सावरकर यांनी स्पष्ट शब्दांत खंडन केले. हिमानी सावरकर या सध्या देवास (मध्य प्रदेश) येथे आहेत. तेथून दूरध्वनीवरून त्यांनी ‘दिव्य मराठी'शी संवाद साधला.
सावरकर म्हणाल्या, ‘नथुराम गोडसे यांच्या फाशीच्या दिवसाची आम्ही आठवण जरूर ठेवतो. पण याचा अर्थ आम्ही गांधी हत्येचा दिवसदेखील शौर्य दिन म्हणून पाळू, असे कोणाला वाटत असेल तर ते अगदी चुकीचे आहे. नथुराम यांना १५ नोव्हेंबरला अंबाला येथे फाशी देण्यात आली. तत्पूर्वी त्यांनी त्यांच्या अस्थींचे विसर्जन अखंड हिंदुस्थानात करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांची ती इच्छा अजून पूर्ण झालेली नाही. त्यांच्या अंतिम इच्छेचा मान ठेवून आम्ही अस्थिकलशाचे पूजन करतो. त्यांची इच्छा जमलेल्या लोकांपुढे वाचून दाखवतो. या कार्यक्रमात कुठेही गांधीविरोध किंवा गांधीद्वेषाचा शब्ददेखील उमटत नाही. याव्यतिरिक्त पूर्ण वर्षभरात आम्ही कोणताही कार्यक्रम अाजवर घेतला नाही. गांधींच्या पुण्यतिथीला काही वेगळे करण्याचा तर प्रश्नच उदभवत नाही.
अजितदादांचे औटघटकी ‘मौन’
धरणातील पाण्यासंदर्भातले वादग्रस्त वक्तव्य करून दुष्काळग्रस्त जनतेची थट्टा केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार गेल्या वर्षी अडचणीत आले होते. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीजवळ दिवसभराचे मौन पाळून पवार यांनी प्रायश्चित्त घेतले होते. त्यानंतर आजच्या गांधीदिनी अजित पवार पुन्हा काही वेळ मौनात गेले. नथुराम गोडसे प्रवृत्तीचे उदात्तीकरण होत असल्याच्या विरोधात अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गांधी पुतळ्याजवळ काही वेळ मौनात राहण्याचा प्रयत्न केला. अर्थातच काही वेळ. वृत्तवाहिन्यांचे कॅमेरे आणि वृत्तपत्रांच्या छायाचित्रकारांची गर्दी हटल्यानंतर मौन सुटले. एवढेच नव्हे तर आंदोलनानंतर अजितदादांनी लगेच माध्यम प्रतिनिधींशी संवादही साधला.