आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mahayuti News, Mp Shetty Parties Demands Minimum 12 Seats

स्वाभिमानीला किमान 12 जागा हव्यात, अन्यथा महायुतीला रामराम- सदाभाऊ खोत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- स्वाभिमानी शेतकरी संघटनेने महायुतीकडे 38 जागा लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र, त्यातील किमान 12 जागा दिल्या तरच आम्हीच महायुतीत राहू, अन्यथा आमचा मार्ग वेगळा राहील असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी महायुतीला दिला आहे. महायुतीत भ्रष्ट लोकांना स्थान दिले जात आहे, त्यांना पक्षात घेताना आम्हाला विचारले जात नसल्याचे सांगत गोपीनाथ मुंडे यांच्या निधनामुळे महायुतीचे खंबीर नेतृत्त्व हरवल्याची प्रतिक्रिया खोत यांनी दिली.
खोत हे मराठवाड्याच्या दौ-यावर आहेत. त्यावेळी औरंगाबाद पत्रकारांशी बोलताना खोत यांनी सांगितले की, महायुतीतील सुसंवाद थांबला आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या दुर्देवी मृत्यूनंतर त्यांची जागा माननीय उद्धव ठाकरे घेतील असे वाटले होते. मात्र, ते पुढाकार घेण्याचे टाळत आहेत. महायुतीत अनेक भ्रष्ट नेत्यांना स्थान दिले जात आहे. अनेक भ्रष्ट कारखानदारांना व प्रस्थापितांना पक्षात प्रवेश दिले जात आहेत. आम्हाला याबाबत कोठेही विश्वासात घेतले जात नाही. या लोकांशी आम्ही अनेक काळ संघर्ष करीत आहोत. मात्र, राष्ट्रवादीतील ही उंदरे आघाडीची सत्ता जाणार म्हणताच महायुतीत येऊ पाहत आहेत. मात्र, अशा उंदरांमुळे महायुतीचे नुकसान होऊ शकते. महायुतीने सत्ता आपलीच आहे असे समजण्याचे कारण नाही असे खोत यांनी म्हटले आहे.
जागावाटपाबाबत उशीर होत असल्याबाबत नाराजी व्यक्त करताना खोत म्हणाले, महायुतीतील घटकपक्षांना किमान 25 तरी जागा द्यायला हव्यात. आम्हाला जर 5-6 जागा देणार असाल तर आम्हाला महायुतीत राहण्यास स्वारस्य नाही. याबाबत महादेव जानकर, आठवलेंसह मेटेंशी चर्चा करू व पुढील भूमिका ठरवू असेही खोत यांनी सांगितले. उद्धव ठाकरे महायुतीतील वरिष्ठ नेते आहेत त्यांनी महायुतीची सूत्रे हाती घ्यावीत असेही खोत यांनी सांगितले.