पुणे - दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुढाकाराने तयार झालेल्या पाच पक्षांच्या ‘महायुती’चे विधानसभेचे जागावाटप रखडण्याची शक्यता आहे. महायुतीतल्या तीन छोट्या पक्षांनी बुधवारी शिवसेना- भाजपला वगळून पुण्यात जागा वाटपाची चर्चा केली.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी, सदाभाऊ खोत, ‘शिवसंग्राम’चे विनायक मेटे आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांनी लोकसभेच्या निकालानंतर प्रथमच एकत्र बोलणी केली. या तिन्ही पक्षांना सुमारे 75-80 ठिकाणी उमेदवार उभे करण्याची इच्छा असल्याचे बैठकीतील चर्चेतून स्पष्ट झाले. जागा वाटपाची अंतिम चर्चा महायुतीच्या बैठकीतच होणार असली तरी मित्रपक्षात समन्वय साधण्यासाठी बैठक बोलावल्याचे शेट्टी म्हणाले.
भाजप-शिवसेनेने गेल्या अनेक निवडणुकात न जिंकलेल्या तसेच ज्या ठिकाणी आजवर त्यांना तिसर्या- चौथ्या स्थानावर राहावे लागले, अशाच जागा मित्रपक्षांना हव्या आहेत, याबाबत पुण्यातील बैठकीत चर्चा झाली.
लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेने राज्यात नवे मित्रपक्ष जोडले. लोकसभेतील अभूतपूर्व यशानंतर राज्यातही सत्ता परिवतर्नाची शक्यता दिसू लागल्याने या मित्रपक्षांच्याही आता अपेक्षा वाढल्या आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी गोपीनाथ मुंडे हवे होते. ग्रामीण भागातील राजकीय समीकरणे जाणणारा आणि मित्रपक्षांची ताकद ओळखणारा दुसरा नेता महायुतीकडे नाही, अशी भावना मित्रपक्षाच्या नेत्यांनी बुधवारच्या बैठकीत व्यक्त केली.
बाबा, दादा, आबा निशाण्यावर
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (कराड), उपमुख्यमंत्री अजित पवार (बारामती), सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील (इंदापूर), गृहमंत्री आर. आर. पाटील (तासगाव), वनमंत्री पतंगराव कदम (पलुस), ग्रामविकासमंत्री जयंत पाटील (इस्लामपुर) या नेत्यांविरोधात निवडणूक लढविण्याची ‘स्वाभिमानी’ची इच्छा आहे.