आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासदार करा, अन्यथा सत्ता विसरा - रामदास आठवलेंचा इशारा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - ‘शिवसेना-भाजपला महाराष्ट्र जिंकायचा असेल तर मला राज्यसभेवर निवडून आणणे आवश्यक आहे. भीमशक्तीला टाळण्याचा प्रयत्न झाला तर त्यांना सत्ता मिळणार नाही. मला ‘राज्यसभा’ देण्याची जबाबदारी भाजप नेते गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आहे. त्यासाठी मी युतीच्या मागे फिरणार नाही,’ असा इशारा रिपाइंचे नेते रामदास आठवले यांनी दिला. एकदा हे ठरले की मग लोकसभा जागावाटपाचा निर्णय घेऊ, असा निरोप आपण मिलिंद नार्वेकरांकरवी ‘मातोर्शी’वरून पाठवला आहे, असेही आठवले म्हणाले.
दलितांच्या पाठिंब्याचा उपयोग खासदारकीसाठी करून घेत असल्याच्या टीकेवर आठवले म्हणाले की, काँग्रेस, राष्ट्रवादीकडूनही यापूर्वी मला ऑफर आली होती. दक्षिण मध्य मुंबई, लातूर किंवा पुण्यातून मी लोकसभेवर जाऊ शकतो. पण प्रचाराला अधिक वेळ मिळावा म्हणून राज्यसभेवर जावे, असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे, असेही आठवले यांचे म्हणणे आहे.
खासदारकीचा मार्ग निर्धोक असावा अशीही अटकळ आठवले बांधत आहेत. राज्यसभेवर पाठवताना मला सहावी जागाच दिली जावी. सातवी जागा सुरक्षित नाही. मनोहर जोशी इच्छुक असतील तर त्यांना ती द्यावी, असे उद्धव ठाकरे यांना मी सांगितले आहे, असेही आठवले म्हणाले. राज्यातून शक्य नसेल तर भाजपशासित कोणत्याही राज्यातून मला राज्यसभेवर पाठवावे. याबाबत उद्धव ठाकरे लवकरच भाजप अध्यक्ष राजनाथसिंह यांच्याशी यासंदर्भात चर्चा करणार आहेत.
आठवलेंची राज्यसभेची वाट बिकट
प्रकाश जावडेकर (भाजप), डॉ. भारतकुमार राऊत (शिवसेना), हुसेन दलवाई, मुरली देवरा (काँग्रेस), राजकुमार धूत (शिवसेना), डी. वाय. त्रिवेदी, डॉ. जनार्दन वाघमारे (राष्ट्रवादी काँग्रेस) या राज्यसभा खासदारांची मुदत एप्रिल 2014 मध्ये संपत आहे. विधिमंडळातील संख्याबळ पाहता युतीचा एक खासदार सहज निवडून येऊ शकतो. दुसर्‍या जागेसाठी संघर्ष करावा लागणार आहे. भाजपकडून जावडेकरांना पुन्हा संधी मिळू शकते. त्यामुळेच आठवले अडचणीत येऊ शकतात.
लातूर, सातारा, पुण्याची जागा द्या
वर्धा, रामटेक, लातूर, सातारा, पुणे यापैकी लोकसभेच्या तीन जागा महायुतीत आम्हाला मिळाल्या पाहिजेत. वध्र्यातून डॉ. अनिल बोंडे, सातार्‍यातून राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी रिपाइंच्या तिकिटावर लढावे याचे प्रयत्न सुरू आहेत. लातूरसाठी भक्कम उमेदवार आहेत, असे आठवले म्हणाले.