आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माळीण: मृतांचा आकडा 152 वर, ढिगारा उपसण्याचे काम संपले!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र- ढिगारा उपसण्याचे काम 8 दिवसानंतर जवळपास संपले आहे.)
पुणे- पुणे जिल्ह्यातील माळीण दुर्घटनेतील मृतांचा आकडा 152 इतका झाला आहे. यात 71 महिला, 59 पुरुष तर, 22 मुलांमुलींचा समावेश आहे. मृतांत 144 लोक हे माळीण गावातील आहेत तर, 8 जण नातेवाईक-पाहुण्यांचा समावेश आहे. या घटनेला आज सकाळी आठ दिवस पूर्ण झाले असून, ढिगारा उपसण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे.
गेल्या आठ दिवसापासून ढिगारा उपसण्याचे काम अविरत सुरु आहे. यादरम्यान पावसाने हजेरी लावल्याने बचावकार्याला अडथळा निर्माण झाला होता. त्यातच जागा अरुंद, चढाची व डोंगराने वेढल्याली असल्यामुळे पोकलेन व बुलडोझरचे काम एकाच दिशेने सुरु होते. जिवंत व्यक्ती बाहेर काढण्याचे आव्हानही प्रशासनापुढे होते. त्यामुळे वेळ लागत होता. मंगळवारी रात्री 8 वाजेपर्यंत ढिगारा उपसण्याचे काम 95 टक्के पूर्ण झाले होते. आज सकाळी माळीण परिसरात पावसाच्या सरी कोसळत होत्या. तरीही एनडीआरएफच्या जवानांनी हे आठ दिवसाचे कठिण काम पूर्ण केले आहे. अजूनही ढिगा-याची हालवाहालव करण्यात येत आहे. आणखी मृतदेह सापडण्याची शक्यता नाही. मात्र, या लोकांचे सामान सगळे चिखलात गेल्याने काही मौल्यवान वस्तूंचा शोध नातेवाईक घेत आहेत.
दुसरीकडे, 152 पैकी 140 मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. इतरांचे मृतदेह ओळखणे कठिण झाल्याने डीएनए चाचणी करून मृतदेहाची ओळख पटविण्यात येत आहे. त्यानंतरच अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांकडे सुपूर्त करण्यात येत आहे. आज दुपारपर्यंत उर्वरित मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मृतांची ओळख पटविणे गरजेचे आहे कारण शासकीय मदत मिळविण्यासाठी या बाबींचा पुरावा द्यावा लागणार आहे. माळीण गावठाणात मृतदेहामुळे दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे वैद्यकीय अधिका-यांनी गावात व परिसरात जलजन्य व कीटकजन्य आजारांबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु केली आहे.
या दुर्घटनेत 47 घरे नष्ट झाली आहेत. यात सुमारे 167 लोक गाडले गेल्याची भीती गावक-यांनी प्रशासनाकडे व्यक्त केली होती. त्यातील 10-12 लोकांना जिवंत बाहेर काढण्यात यश आले आहे. मात्र, मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता कमी असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. तरीही आणखी चार-पाच जणांचा पत्ता लागत नसल्याचे गावक-यांचे म्हणणे आहे. त्यामुळे मृतांचा अंतिम आकडा 157 किंवा 158 वर जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.