आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसटी चालकाची ‘आँखों देखी’ : ‘त्या’ दिवशी माळणीतील घरे दिसलीच नाहीत !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माळीण गावावर कोसळलेले डोंगराएवढे संकट सर्वप्रथम सर्वांसमोर आणले ते बस- चालक प्रताप काळे यांनी. नारायणगाव डेपोमध्ये कार्यरत असलेले काळे दररोज मंचरहून आहुपेला एसटी घेऊन जातात. मात्र बुधवारच्या सकाळी त्यांना आलेला अनुभव थरकाप उडवणारा होता. ‘दिव्य मराठी’कडे त्यांनी व्यक्त केलेला हा भयंकर अनुभव...!
मंगळवारी मी मंचरहून एसटी बस घेऊन आहुपेला मुक्कामी गेलो होतो. बुधवारी सकाळी पावणेसात वाजता मी, कंडक्टर मदन दामसे व 17 ते 18 प्रवासी घेऊन मंचरच्या दिशेने निघालो होतो. रात्रीच्या पावसाने कोंढरे घाटात एक झाड पडले होते. त्यामुळे आमची बस पुढे जाऊ शकत नव्हती. कोंढरे गावातून कुर्‍हाड आणून प्रवाशांच्या मदतीने झाड कापून बाजूला केले. थोडेसे अंतर पार करून पुढे गेलो असता, खालच्या बाजूने दोन लोक जोरात एसटीच्या दिशेने पळत येताना दिसले. त्यांनी गाडी थांबवून ‘माळीणमध्ये डोंगर कोसळला आहे, गाडी पुढे जाणार नाही,’ असे सांगितले. खाली उतरून कोंढरे बसस्टँडच्या मागे जाऊन माळीण गावाकडे पाहिले असता, दररोज दिसणारे या गावातील घरे, कौले, रस्ता यापैकी मला काहीच दिसले नाही. केवळ मातीचा मोठा ढिगारा आणि त्यावरून वाहत असलेले पाणी दिसत होते. हे भयंकर दृश्य पाहून काय करावे समजत नव्हते. तेवढ्यात एक प्रवासी महिला जोरात ओरडत माळीणच्या दिशेने कोंढारे टेकडीवरून पळत सुटली. तिच्यामागे काही प्रवासीही धावले.
माझा भाऊ भगवान काळे हाही एसटी चालक आहे. तो दररोज राजगुरुनगर-आहुपे रस्त्यावर बस चालवतो. मी तातडीने त्याला फोन करून या दिशेने येऊ नका, अशा सूचना दिल्या. त्यानंतर मी आगारप्रमुखांना व पोलिसांना फोनवरून माहिती दिली.

...अन् नुसते फोन खणखणू लागले
दुर्घटनेची माहिती प्रशासन, पोलिस, मीडियाला कळताच अर्ध्या तासात मला फोन येणे सुरू झाले. काय घडले, आता परिस्थिती काय, अशा विविध प्रश्नांची सरबत्ती होऊ लागली. त्यानंतर दोन तासांनी अ‍ॅम्ब्युलन्स व गाड्या माळीणकडे धावू लागल्या व मदतकार्य सुरू झाले. ही थरारक घटना मी कदापिही विसरू शकत नाही. शब्दांकन : मंगेश फल्ले