आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ढिगार्‍याखाली शाळेचा पटच लुप्त; 40 विद्यार्थ्यांचा शोध अजूनही सुरूच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - माळीण गावात दरड कोसळून अख्खे गावच ढिगार्‍याखाली गाडले गेले आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे या ढिगार्‍याखाली माळीण जिल्हा परिषद शाळेतील 35 ते 40 विद्यार्थी गाडले गेले आहेत. त्यामुळे माळीण गावात आता शाळा असली, तरी शाळेतील विद्यार्थ्यांचा पट लुप्त झाल्याचे चित्र आहे.
माळीणमध्ये स्वामी फाउंडेशन मुंबई व सर्व शिक्षा अभियान पुणे यांच्या साहाय्याने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची उभारणी करण्यात आली आहे. या प्राथमिक शाळेत माळीण तसेच आंबडे, झांजरेवाडी, पोटेवाडी, चिंचेवाडी, पसारवाडी, लेंबेवाडी, कोकणेवाडी येथील विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. यामध्ये माळीणमधील विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक असून बुधवारी सकाळी शाळेत जाण्यासाठी सर्व जण घरी तयारी करत होते. त्याच वेळी मोठा आवाज होऊन डोंगरमाथ्यावरील मातीचा ढिगारा गावावर कोसळला. या दुर्घटनेत माळीण शाळेतील मुलेही ढिगार्‍याखाली दबली गेली असून त्यांचा शोध अजूनही सुरूच आहे.

पुनर्वसनासाठी मदतीचे आवाहन
दुर्घटनाग्रस्त माळीण गावाच्या पुनर्वसनासाठी ज्या इच्छुक संस्थांना मदत करायची आहे त्यांनी ‘मुख्यमंत्री सहायता निधी’ या नावाने धनादेश हा सर्वसाधारण शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, नवीन इमारत पहिला मजला, जुने विधान भवन पुणे. प्रांत अधिकारी खेड, प्रांत अधिकारी जुन्नर या ठिकाणी पाठवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
जवानांसमोर रोगराईचे संकट
माळीण दुर्घटनेत अजूनही ढिगार्‍याखाली सुमारे शंभर मृतदेह अडकलेले आहेत. घटनेला चार दिवस झाल्याने ढिगार्‍याखाली अडकलेल्या मृतदेहांची दुर्गंधी पसरत आहेत. त्यामुळे जवानांसमोररोगराईचा धोका निर्माण झाला आहे. माळीण गावातील शाळेजवळील मातीचा ढिगारा काढण्यात आला असला, तरी डोंगरमाथ्याच्या वरच्या भागातील ढिगारा काढण्यास अजून दोन दिवसांचा कालावधी लागणार आहे. हा ढिगारा काढताना डोंगरमाथ्यावरून खाली येणारी माती व पाणी रोखण्याचे प्रयत्न जवान करत आहेत. मात्र, येथे सुरू असलेल्या संततधार पावसामुळे बचाव कार्यात अडथळे निर्माण होत आहेत.
आतापर्यंत काढले 82 मृतदेह
माळीण गावातील ढिगार्‍यातून आतापर्यंत 82 जणांचे मृतदेह काढण्यात आले आहेत. या दुर्घटनेत 44 कुटुंबांतील 167 जण गाडले गेले आहेत. ढिगारा उपसण्यासाठी जेसीबी, पोकलेनच्या मदतीने राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे (एनडीआरएफ) जवान रात्रंदिवस प्रयत्न करत आहेत. ढिगार्‍याबाहेर काढलेल्या मृतदेहांचे शवविच्छेदन अडिवरे प्राथमिक ग्रामीण रुग्णालयात करून त्यांच्यावर माळीण फाट्यावरील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. शनिवारी दुपारपर्यंत एकूण 73 मृतदेहांची ओळख पटवून त्यांच्यावर सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले.

गृहमंत्री आर. आर. पाटील, माणिकराव ठाकरे यांची भेट
गृहमंत्री आर.आर.पाटील व मदत आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी शनिवारी माळीण गावास भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. व्होडोफोन या मोबाइल कंपनीने शनिवारी या भागात आपत्कालीन टॉवरची उभारणी करून मोबाइल रेंज मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले.

शाळा आहे; पण विद्यार्थी नाहीत
माळीणमध्ये गावातील घरे नष्ट झाली असली, तरी चार ते पाच घरे व शाळेची इमारत सुरक्षित राहिली आहे. बुधवारी सकाळी झालेली घटना काही अंतराने घडली असती, तर विद्यार्थ्यांचे प्राण वाचले असते, अशी हळहळ या दुर्घटनेतून वाचलेल्या ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे. गावात शाळेची इमारत शिल्लक राहिली. मात्र, विद्यार्थीच नसल्याने शिक्षकांसह गावकरी शोकाकुल आहेत.

श्वान पथकाची मदत
माळीण येथे चौथ्या दिवशी मृतदेहांची दुर्गंधी पसरूलागल्याने आता एनडीआरएफच्या जवानांनी मृतदेह शोधण्यासाठी श्वान पथकाची मदत घेण्यास सुरुवात केली आहे. राज्य शासनाच्या महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस (डायल 108)चे 14 वैद्यकीय अधिकारी घटनास्थळ, अडिवरे, मंचर, घोडेगाव येथे तैनात करण्यात आले आहेत.