आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Malin Landslide: Rescue Operations Draw To A Close

मोहीम फत्ते : माळीणमध्ये मृत्यूच्या दाढेतून 38 बचावले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - ‘माळीण (ता. आंबेगाव) गावावर 30 जुलै रोजी कोसळलेल्या भीषण नैसर्गिक आपत्तीत 40 कुटुंबे ढिगार्‍याखाली गाडली गेली. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाने (एनडीआरएफ) केलेल्या बचावकार्यात 38 जणांना वाचवण्यात यश आले असून ढिगार्‍याखालून 151 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत,’ अशी माहिती जिल्हाधिकारी सौरव राव यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. या दुर्घटनेचा सविस्तर अहवाल केंद्र व राज्य सरकारला गुरुवारीच सादर करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

गेले आठ दिवस सुरू असलेले माळीणमधील मदतकार्य बुधवारी संपले. ‘एनडीआरएफ’च्या नऊ पथकांसह विविध शासकीय विभागांतील 2508 अधिकारी व कर्मचारी तसेच स्वयंसेवी संस्थेच्या 715 स्वयंसेवकांनी या मदतकार्यात हातभार लावला. माळीण गावाची लोकसंख्या सन 2011 च्या जनगणनेनुसार 704 होती. त्यापैकी गावठाणातील 181 व्यक्ती या आपत्तीमुळे बाधित झाल्या आहेत.

आतापर्यंत मिळालेल्या 151 मृतदेहांपैकी 104 मृतांची (61 स्त्री, 43 पुरुष) ओळख पटली आहे. या गावातील एका दशक्रिया विधीसाठी आलेले आठ पाहुणेही मृत्युमुखी पडले असून एक जण जखमी झाला आहे. 36 मृतांची डीएनए टेस्ट घेण्यात आली असून त्यांचा अहवाल लवकरच प्रशासनाकडे येईल. सर्व मृतांवर सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले असून 10 ऑगस्ट रोजी त्यांचा सामूहिक दशक्रिया विधी केला जाणार असल्याचे राव म्हणाले.

40 बालके दगावली
माळीणमध्ये शून्य ते सहा वयोगटातील 12 मुले दगावली, तर सात जण बचावले. प्राथमिक शाळेत शिकणारे 19 विद्यार्थी मृत झाले असून केवळ दोघे जण बचावले. माध्यमिक शाळेतील एकूण 15 मुलांपैकी नऊ मुले दगावल्याचे स्पष्ट झाले आहे.
सात लाखांची मदत
प्रत्येक मृताच्या वारसांना केंद्र व राज्य सरकारकडून सात लाख रुपये देण्यात येतील. तसेच जखमींना केंद्राकडून 50 हजार रुपये, तर राज्य सरकारकडून औषधोपचाराचा संपूर्ण खर्च दिला जाणार आहे. बचावलेल्या व्यक्तींना रोजगार व व्यवसाय प्रशिक्षण देण्यासाठी मदत केली जाणार असल्याचे राव म्हणाले.

महिन्याचे जेवण प्रशासन पुरवणार
आपत्तीग्रस्त 60 जणांच्या निवासाची तात्पुरती व्यवस्था आसाने आर्शमशाळेत करण्यात येत आहे. या ग्रामस्थांना प्रशासन महिन्यापर्यंत जेवण पुरवणार आहे. ज्यांचे रेशनकार्ड, जात प्रमाणपत्र अशी कागदपत्रे नष्ट झाली आहेत, त्यांना ती गावातच उपलब्ध करून दिली जात आहेत. गावकर्‍यांशी चर्चा करून आणि स्वयंसेवी संस्था, भूवैज्ञानिक संस्था, आपत्कालीन संस्थांच्या सल्ल्याने कायमस्वरूपी पुनर्वसन केले जाईल.

एनडीआरएफचे प्रमुख आलोक अवस्थी म्हणाले, माळीणमध्ये आठ दिवस रात्रंदिवस 360 जवान व 11 अधिकारी कार्यरत होते. संततधार पाऊस, मातीची दलदल यामुळे बचावकार्यात अडथळे येत होते. सुरुवातीला लाइव्ह डिटेक्टरच्या साह्याने ढिगार्‍याखाली कुणी जिवंत आहे काय? याचा शोध घेण्यात आला. ‘नेत्र’ या उपकरणाद्वारे घटनास्थळाच्या दोन किलोमीटर भागाची एक हजार फुटांवरून छायाचित्रे घेऊन ती जिऑलॉजिकल तज्ज्ञांना उपलब्ध करून देण्यात आली आहेत. अशा मोठय़ा दुर्घटनेत रिकव्हरी मिळण्याचे प्रमाण कमी असते, मात्र माळीणमध्ये मोठी रिकव्हरी करण्यात आम्ही यशस्वी ठरलो, त्याचे समाधान आहे.

कोर्टाचे पथक जाणार
या नैसर्गिक आपत्तीबाबतचा सविस्तर अहवाल सर्वोच्च न्यायालयाने पुणे जिल्हा न्यायालयाकडे मागवला आहे. त्यानुसार पुण्याचे मुख्य न्यायाधीश कालिदास वडणे यांच्यासह न्यायालयाचे एक पथक शुक्रवारी माळीण गावात जाऊन घटनास्थळाची पाहणी करणार आहे.