आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Malin Landslide: Rescue Operations Enter Final Phase

माळीणमधील बचावकार्य आठ दिवसानंतर पूर्ण; एक पथक गावातच राहणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - दरड कोसळून माळीण (ता. आंबेगाव) गाव ढिगार्‍याखाली गाडले गेल्याच्या घटनेस बुधवारी आठ दिवस पूर्ण झाले. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या (एनडीआरएफ) पथकाचे बचावकार्य बुधवारी संपले. या काळात ढिगार्‍याखालून 152 मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. दरम्यान, गावातील परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत ‘एनडीआरएफ’चे एक पथक गावातच कार्यरत राहणार आहे.

निसर्गाच्या कोपात वाचलेली घरेही राहण्यास धोकादायक असल्याची नोटीस प्रशासनाने त्या घरावर चिकटवली आहे. या घरांतील लोकांची आसाने येथील आश्रमशाळेत राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, तर काहींनी नातेवाइकांकडे आश्रय घेतला आहे.दुर्घटनेत बचावलेल्या 56 कुटुंबांचे पुनर्वसन जवळच्या परिसरातच करणार असल्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी सांगितले आहे. मात्र, त्याकरिता अद्याप जागा निश्चित करण्यात आलेली नसून ‘जीआयएस’च्या तज्ज्ञांची या कामी मदत घेतली जाणार आहे.

एनडीआरएफचे प्रमुख आलोक अवस्थी यांच्या मार्गदर्शनाखाली 360 जवान ढिगारे उपसण्याचे काम करत आहेत. आठ जेसीबी व पोकलेनद्वारे यांनी 152 शव काढले असले, तरी शासकीय आकडेवारीनुसार 44 कुटुंबांतील 167 व्यक्ती गाडले गेल्याची शक्यता आहे.

अवस्थी म्हणाले, आमचे जवान 24 तास कार्यरत आहेत. मंगळवारी रात्री साडेदहा वाजेनंतर आम्हाला एकही शव मिळालेले नाही. कोणते शव अथवा त्याचा भाग परिसरात राहू नये याकरिता सर्व ठिकाणी जवान तपासणी करत आहेत. महाराष्ट्रातील ही मोठी दुर्घटना असून ‘एनडीआरएफ’समोर दलदलीत बचावकार्य करण्याचे मोठे आव्हान होते.

डीएनए चाचणी करणार
दुर्घटनाग्रस्त कुटुंबीयांना राज्य सरकारमार्फत पाच लाखांची तर केंद्रामार्फत दोन लाख रुपयांची मदत जाहीर झाली आहे. कुजलेल्या मृतदेहांची डीएनए चाचणी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यावरून मृतांची ओळख पटणार असून, त्यांच्या कुटुंबीयांना शासकीय मदत देण्यासाठीही ही चाचणी उपयुक्त ठरणार आहे. डीएनए चाचणीचा अहवाल व वारसांचे डीएनए जुळवून पाहिले जाणार असून या प्रक्रियेस विलंब लागू शकतो.