आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्धवस्त माळीण: 136 मृतदेह मिळाले, 20 ढिगा-याखालीच; आज-उद्या काम संपणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र- माळीण गावात ढिगारा उपसण्याचे काम सहाव्या दिवशीही सुरु आहे)
पुणे- जिल्ह्यातील माळीण गावावर अख्खा डोंगर कोसळल्यानंतर आठवड्याभरानंतरही येथील परिस्थिती भकास अशीच आहे. एनडीआरएफचे जवान रात्रंदिवस काम करीत असून, त्यांच्या अथक प्रयत्नामुळे मंगळवार सकाळीपर्यंत किमान 136 मृतदेह हाती लागले आहेत. यात 53 पुरुष, 61 महिला तर, 22 लहान मुला- मुलींचा समावेश आहे. यातील 110 मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. तर, अजूनही 20 मृतदेह ढिगा-याखालीच आहेत. पावसाचा अधून-मधून खेळ सुरुच असला तरी बचावकार्य जोरात सुरु आहे.

दरम्यान, उर्वरित ढिगारा उपसण्याचे काम बुधवारपर्यंत चालण्याची शक्यता आहे. त्यामुळे ढिगा-याखाली आता कोणीही जिवंत सापडण्याची शक्यता नाही. बुधवारी पहाटे घडलेल्या या घटनेला आता सहा दिवस झाले आहेत. तरीही ढिगारा उपसण्याचे काम 80-85 टक्केच झाले आहे. अद्यापही चढाचा व ढिगा-याचा मोठा भाग उपसण्याचे काम बाकी आहे. पाच पोकलेन व एक बुलडोझरच्या सहाय्याने काम अविरत सुरु आहे. प्रशासन याबाबत समाधानी असले तरी त्यांच्यापुढे आणखी डोकेदुखी वाढली आहे. या गावातील जिवंत लोकांचे पुनवर्सन कोठे व कसे करायचे हा प्रश्न प्रशासनाला पडला आहे. सततच्या पावसामुळे परिसरात घाणीचे व चिखलाचे साम्राज्य झाले आहे. परिसरात दुर्गंधी परसली आहे. त्यामुळे रोगराई व आजारपण गावक-यांच्या मागे लागू शकते. तसेच तेथे जवानही अहोरात्र झटत आहेत. या सर्वांना संसर्गजन्य रोगांची लागण होऊ नये म्हणून टीटीचे इंजेक्शन व इतर औषधे देण्यात येत आहेत.
प्रशासनाने घटनेत बचावलेल्या गावक-यांना इतरत्र हलविले आहे. तरीही काही गावकरी गाव सोडण्यास तयार नाहीत. काहींनी नातेवाईकांकडे मुक्काम ठोकला आहे. जी 44 घरे या घटनेतून बचावली होती. ती घरेही धोकादायक स्थितीत असल्याने प्रशासनाने घरमालकांना नोटिसा देऊन खाली करण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र, या सर्व गावक-यांचे कायमस्वरूपी पुनर्वसन कोठे व कसे करायचे याबाबत प्रशासन चिंताग्रस्त आहे. गावकरीही अद्यापही या घटनेने भेदरलेले आहेत. ते काहीही बोलण्याच्या व मागण्याच्या मनस्थितीत नाहीत. एकूनच पुढील चार-पाच दिवस म्हणजेच ढिगारा उपसण्याचे काम जोपर्यंत पूर्ण होत नाही व पाऊसही थांबत नाही तोपर्यंत प्रशासन वेगाने चक्रे फिरवू शकत नाही. त्यामुळे पुढील चार-पाच दिवस आणखी अशीच स्थिती राहण्याची शक्यता आहे.
पुढे आणखी पाहा व वाचा...