(छायाचित्र- सन्मान स्वीकारल्यानंतर माळीण येथील आपला अनुभव सांगताना डॉ. प्रीती कल्याणकर)
पुणे- अम्ब्यूलंस गर्दीने अडकल्यावर माळीणला पावसात 4 किलोमीटर चालत जाउन गर्दीत उभे राहिल्यावर जवानांकडून डॉक्टर- डॉक्टर असा आवाज आला आणि उपस्थित डॉक्टर पैकी मी एकटीच पळत गेले. गुडघाभर चिखलातून गेल्यावर जवानांनी एक महिला आणि तिने पायात पकडलेले बाळ दाखवले. हे बाळ फक्त डॉक्टरच्या हातात देण्याचा तिचा निर्धार दिसत होता. मी बाळ हातात घेतले. चेहऱ्यावरील माती काढली आणि बाळ टुकू टुकू पाहू लागले! त्या आईला हे सांगितले आणि घाबरू नका इतके सांगितले. तिथेच सर्वांच्या जीवात जीव मिळाला. डॉक्टरी सेवेत महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्विस मध्ये काम सुरु करून केवळ 2 महिने झाले पण या क्षणाने आयुष्भर पुरेल इतकी कृतार्थता दिली.' अशा शब्दात डॉ प्रीती कल्याणकर यांनी 'तो' थरारक अनुभव सर्वाना सांगितला आणि उपस्थित सारेच शहारून गेले.
बीव्हीजी इंडिया लिमिटेड आणि महाराष्ट्र मेडिकल इमर्जन्सी सर्विसच्या वतीने माळीण आणि पंढरपूर वारीत मदतकार्य करणाऱ्या 50 हून अधिक डॉक्टर -पायलट आणि अधिकाऱ्यांचा सन्मान केला. त्यावेळी प्रीती यांनी भावनांना वाट मोकळी करून दिली. हा कार्यक्रम आयएमए सभागृहात मंगळवारी सायंकाळी झाला. या सर्वाना आपत्कालीन वैद्यकीय सेवा विषयातील तज्ञ डॉ. प्रसाद राजहंस आणि महाराष्य्र इमर्जन्सी मेडिकल सर्विसचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर डॉ. ज्ञानेश्वर शेळके यांच्या हस्ते प्रमाणपत्र देवून सन्मान करण्यात आला. सुरुवातीला माळीण दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी डॉ. कुमार राक्षे, डॉ. गणेश सोनुने, डॉ. प्रवीण साधले, डॉ. राजेंद्र जगताप, डॉ. साकेत टिळेकर, डॉ. स्वप्नील चौगुले, डॉ. मोरे, डॉ. उके आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. प्रीती कल्याणकर म्हणाल्या, माझे कोणी त्या ढिगाऱ्यात अडकले असते तर मी धावून गेलेच असते आणि चिकाटीने थांबले असते. त्याचप्रमाणे आम्ही 'एमईएमएस'चे डॉक्टर चिकाटीने तिथे थांबून राहिलो. त्यामुळे मायलेकांचा जीव वाचविता आला.
डॉ. ज्ञानेश्वर शेळके म्हणाले, इमर्जन्सी घटनांमध्ये कसे काम करावे याचे प्रबोधन समाजात, पोलिसांत, विद्यार्थ्यांत करणे गरजेचे आहे. महारष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्विस हि आपत्कालीन घटनात तातडीने प्रतिसाद देवून मदतकार्य करणारी वेगवान सेवा आहे, हे रोहा ट्रेन अपघात आणि माळीण घटनेत सिद्ध झाले. 28 रुग्णवाहिकांनी माळीणमध्ये सेवा दिली. पंढरपूर वारीत सुद्धा 67 हजार वारक-र्यांना वैद्यकीय सेवा पुरविण्यात आली. आतापर्यंत राज्यात 500 प्रसूती या 108 सेवेच्या एम्बुलंसमध्ये झाल्याची माहिती त्यांनी दिली. 108 नंबर असलेली महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्विस ही रुग्णवाहिका सेवा राज्य शासनाची असून बीव्हीजी इंडिया लि. या कंपनीकडून ही सेवा संचालित होते.