आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बचाव पथकासमोर अडचणींचा डोंगर, संपर्क साधनांचा अभाव अन् पाऊसही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माळीण - डिंभे धरणापासून दुर्गम भागात धरणाच्या पाणलोट क्षेत्रात वसलेल्या माळीण गावात बुधवारी 44 घरांवर दरड कोसळल्याने भीषण परिस्थिती निर्माण झाली. या परिस्थितीत मदतकार्य पोहोचवण्यात प्रशासन, पोलिस, आरोग्य विभाग, राष्ट्रीय आपत्ती दल यांना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला. अरुंद रस्ते, अपुरी दळणवळण व्यवस्था, संपर्क साधनांची कमतरता, आरोग्य सुविधांचा अभाव, रस्त्यांची दुर्दशा अशा अनेक अडचणी प्रशासनाला मदतकार्यात भेडसावत आहेत. त्यातच मुसळधार पावसानेही मोठय़ा प्रमाणावर अडथळे आणले.

माळीणमध्ये बुधवारी पहाटे या घटनेमुळे संपूर्ण गाव क्षणार्धात बेचिराख झाले. गावातील पुरुष, महिला, मुले अचानकपणे ढिगार्‍याखाली अडकल्याने, ज्यांचा या घटनेत जीव वाचला त्यांना मोठा धक्का बसला. नेमके कोणते मदतकार्य याप्रसंगी करावे, हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला.
यंत्रणा पोहोचण्यास विलंब
घटनेची माहिती कळताच जिल्हा प्रशासनाने तातडीने पावले उचलत ‘एनडीआरएफ’ जवानांना मदतीसाठी पाचारण केले. त्यांचे पथकही तातडीने घटनास्थळी आले. रुग्णवाहिका, डॉक्टर, जेसीबी, डंपर, पोलिस, पिण्याच्या पाण्याचे टँकर आले. मात्र, डिंभे गावापासून 25 किलोमीटर अंतरावर दुर्गम भागात वसलेल्या माळीण येथे अरुंद रस्त्यांमुळे मदत पोहोचवताना या सर्व यंत्रणेला मोठी कसरत करावी लागली.
बघ्यांची मोठी गर्दी
घटनास्थळी मदत पोहोचवताना मोठी कसरत करावी लागत असतानाच अरुंद रस्त्यावरून गावात जाण्यासाठी आजूबाजूच्या ग्रामस्थांनी गाड्यांची गर्दी केली. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली. घटनास्थळाचा परिसर चढणीवर असून मातीचा मोठा ढिगारा कोसळल्याने व पावसामुळे दलदल निर्माण झाली. घटनास्थळी जाण्यास सुमारे पाच किलोमीटरचे अंतर पायी जावे लागत असतानाही बघ्यांर्ची गर्दी कमी होत नव्हती.
वीज गुल, जनरेटरला अडथळे
माळीण दुर्गम भागात वसलेले असल्याने तेथील वाड्या-वस्त्यांवर विजेची मोठी कमतरता आहे. नेहमीचे चालणारे लोडशेडिंग व संततधार पावसामुळे वीज नसण्याची या भागाला सवय आहे. त्यात बुधवारची भीषण दुर्घटना घडल्यानंतर गावात सर्वत्र असलेले विजेचे खांब उन्मळून पडले.

बचावकार्यासाठी प्रशासनाला व आपत्ती निवारण पथकाला रात्रंदिवस काम करावे लागणार आहे. त्या दृष्टीने मंचर, घोडेगाव, डिंभे, भीमाशंकर या आजूबाजूच्या गावांतील जनरेटर घटनास्थळी मागवण्यात आले आहेत. मात्र, अरुंद रस्त्यावरील गाड्यांची गर्दी व सतत कोसळणारा पाऊस तसेच गावात उपलब्ध असलेली छोटीशी जागा यामुळे ही मदत पोहोचवण्यात कसरत करावी लागत आहे.