Home »Maharashtra »Pune» Man And Woman Friendeship Bad - Asaram Bapu

तरुण-तरुणीतील मैत्री म्हणजे सत्यानाश! बापूपुराण सुरुच...

प्रतिनिधी | Jan 10, 2013, 09:31 AM IST

  • तरुण-तरुणीतील मैत्री म्हणजे सत्यानाश! बापूपुराण सुरुच...

बारामती - दिल्लीतील पीडित मुलीबद्दल वादग्रस्त वक्तव्य करून टीकेचे धनी बनलेल्या आसारामबापूंनी बुधवारी पुन्हा नवे तत्त्वज्ञान सांगत रोष ओढवून घेतला. ‘परदेशात दरवर्षी 5 लाखांवर मुली गर्भपात करतात. ही घाण भारतात येऊ देऊ नका. तरुण- तरुणींमध्ये मैत्री वाढल्यास सत्यानाशच होईल,’ अशा शब्दांत त्यांनी ‘व्हॅलेंटाइन डे’ संस्कृतीची खिल्ली उडवली. दोन दिवसांपूर्वी बापूंनी पीडित मुलीलाच दोषी ठरवले होते. ‘तिने मंत्राचा जप करत आरोपींना भाऊ मानले असते तर अत्याचार झाला नसता,’ असा विचित्र उपायही सुचवला होता. यावर स्पष्टीकरण देताना मीडियाची तुलना कुत्र्यांशी केली आणि आता मैत्रीवर तत्त्वज्ञान सांगितले.


... मी तसे कधी बोललोच नाही!-बुधवारी बारामतीमध्ये आयोजित सत्संगात बापूंनी पीडित मुलीबद्दल आपण काहीच गैर बोललो नसल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, ‘चार वर्षांपासून माझ्यावर या ना त्या निमित्ताने विविध आरोप लावण्यात येत आहेत. मात्र, ईश्वर माझ्या बाजूने असल्याने मी व्यथित होत नाही, उलट आत्मबल दृढ होत आहे. मी आरोपी असेन तर अटक का केली जात नाही?’


देशाच्या बदनामीसाठी 62 कोटी खर्चपरदेशी शक्तींनी हिंदुस्थानला बदनाम करण्याच्या कुटिल डाव रचला असून त्यासाठी गेल्या चार वर्षांत 62 कोटी रुपये खर्च केले आहेत.इंग्रजांच्या ‘फोडा आणि झोडा’ नीतीप्रमाणे माध्यमे लोकांना वास्तवापेक्षा भलतेच काही दाखवून दुफळी निर्माण करत आहेत. मात्र, आपल्यावर लोकांची श्रद्धा असल्याने कितीही आरोप झाले तरी फरक पडत नाही, असा विश्वास बापूंनी व्यक्त केला.

पीडित कुटुंबीयांची सेवा करणार-पीडित मुलीच्या पगारावर कुटुंबाची गुजराण होती. हे कुटुंब आता उघड्यावर आले आहे. त्या माता-पित्यांनी मला मुलगा मानून सेवेची संधी द्यावी.

शरद पवारांवर बापूंची स्तुतिसुमने- सत्संग कार्यक्रमात आसाराम बापूंनी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यावर स्तुतिसुमने उधळली. 'पवार हे बुद्धिमान व्यक्तिमत्व आहे. शेतकर्‍यांच्या प्रश्नावर त्यांनी चांगले काम केले आहे. शेतकर्‍यांच्या उसाला त्यांनी 2500 रुपयापर्यंत भाव दिल्याने शेतकर्‍यांच्या विकासात पवारांचे योगदान वाखाणण्याजोगे आहे,' असे बापू म्हणाले.


आसाराम बापूंच्या विरोधात निदर्शने- दिल्लीतील पीडित युवतीलाच दोषी मानणार्‍या आसाराम बापूंविरोधात बुधवारी बारामतीत रोष उफाळून आला. त्यांच्या सत्संग कार्यक्रमस्थळी निदर्शन करण्याचा काही लोकांनी प्रयत्न केला, या वेळी पोलिसांनी चार नगरसेविकांसह 12 महिलांना ताब्यात घेतले. दोन दिवसांपूर्वी आसाराम बापूंनी दिल्लीतील बलात्कार प्रकरणी पीडित युवतीलाच दोषी धरले होते. बुधवारी बापू सत्संगासाठी बारामतीत आले असताना युक्रांदचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टकले यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी रेल्वेस्थानक परिसरात त्यांच्याविरोधात निदर्शन केली. पोलिसांनी तत्काळ या सर्वांना ताब्यात घेतले. तसेच निदर्शने करण्यासाठी नगर परिषदेपासून सत्संग कार्यक्रमाकडे निघालेल्या राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या चार नगरसेविकांसह बारा महिलांनाही पोलिसांनी ताब्यात घेऊन आंदोलन रोखले.

Next Article

Recommended